दोडामार्ग ः साटेली-भेडशी येथे लाकूड वाहतूक करणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गाडीचे नुकसान झाले आहे. रस्त्याच्या चुकीच्या कामामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करत स्थानिक ग्रामस्थांनी ठेकेदाराला फोनद्वारे फैलावर घेतले. यावेळी काही वेळ वातावरण तंग झाले होते. अखेर क्रेनच्या सहायाने गाडी काढण्यात आली.
दोडामार्ग-वीजघर रस्त्याचे काँक्रिटीकरण काम सुरू आहे. याच रस्त्यावरून दोडामार्ग ते साटेली-भेडशी अशी लाकूड वाहतूक करणारा आयशर टेम्पा जात होता. खालच्या बाजारातील मुख्य पुलाजवळ टेंम्पो पोहोचला असता रस्त्याच्या साईडपट्टीवर मातीच्या भरावावर गाडीचे चाक गेले अन् माती ढासळली. परिणामी गाडी रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही, मात्र गाडीचे नुकसान झाले. घटनास्थळी जमलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्याचे चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्याचे म्हणत ठेकेदाराला फोनद्वारे संपर्क केला. ठेकेदार तेथे पोहोचल्यानंतर त्याला चांगलेच फैलावर घेतले. रस्त्याचे काम करत असताना ठेकेदाराची मनमानी, मोठ-मोठे खड्डे, सूचना फलक नसल्याने अनेक अपघात या रस्त्यावर होत आहेत. मंगळवारी याच रस्त्यावर दोन दुचाकीचा अपघात होऊन गोवा येथील एका इसमाला आपला प्राण गमवावा लागला, या सर्व विषयांवर ग्रामस्थांनी संताप व्क्क्त केला. त्यानंतर क्रेनला पाचरण करून पलटी झालेला टेम्पो सरळ केला.