कुडाळ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग वरील तेर्सेबांबर्डे बस स्टॉप ते तेर्सेबांबर्डे गावात जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे गेटला अचानक तांत्रिक बिघाडामुळे 'लॉक' पडल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वा. च्या सुमारास घडली. या प्रकारामुळे ऐन उन्हात वाहनचालकांना तब्बल ४५ मिनिटे खोळंबून राहावे लागले. अखेर रेल्वे प्रशासनाने तातडीने पावले उचलत त्या गेटचे लॉक तोडून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.पण मोठ्या गाड्या जाणे अशक्य होते.या साऱ्या प्रकाराबाबत वाहनचालकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
मुंबई-गोवा महामार्गाला लागूनच तेर्सेबांबर्डे गाव आहे. महामार्ग आणि गाव यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरूनच कोकण रेल्वेचा ट्रॅक जातो. त्यामुळे ट्रेन येण्याच्या काही मिनिटे आधी हे रेल्वे गेट दोन्ही बाजूंनी बंद केले जाते. गुरुवारी दुपारी ४ वा.च्या सुमारास ट्रेन येण्याची वेळ असल्याने गेट नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले होते.
वाहनचालकांची कोंडी अन् मनस्ताप
ट्रेन निघून गेल्यानंतर गेटमनने गेट उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गेटच्या यंत्रणेत अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने त्याला 'लाल लॉक' पडले. दरम्यानच्या काळात, दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रणरणत्या उन्हात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
अखेर रेल्वे प्रशासनाने तोडले लॉक
रस्त्यावरील वाहनांची वाढती संख्या, वाहतूक कोंडी आणि वाहनधारकांचा वाढता संताप लक्षात घेऊन रेल्वेच्या स्थानिक व्यवस्थापनाने तातडीने निर्णय घेतला. दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने अखेर लॉक तोडण्यात आले. यात सुमारे ४५ मिनिटांचा वेळ गेला. हे गेट उघडण्यात आले,पण तेही अर्धवट उघडले त्यामुळे मोठ्या वाहनांना ये-जा करणे अडचणीचे झाले, सायंकाळी उशिरा पूर्ण गेट मोकळे झाल्यानंतर वाहनचालकांनी सुटकेचा श्वास सोडला.