Teachers News Pudhari File Photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg Teachers Protest : १ डिसेंबरपासून शिक्षक प्रशासकीय व्हॉटस्‌ॲप ग्रुपमधून बाहेर पडणार

‘शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या’च्या भूमिकेतून राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, विद्यार्थी, शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रलंबित व न्याय्य मागण्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ राज्यभरातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत येत्या १ डिसेंबरपासून शिक्षक तथाकथित प्रशासकीय व्हॉटस्‌ॲप ग्रुपमधून बाहेर पडणार असून, दैनंदिन अध्यापनात अडथळा आणणारी विविध ॲप्स आणि अनावश्यक ऑनलाइन कामे न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राज्याध्यक्ष विजय कोंबे आणि राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी २५ नोव्हेंबर रोजी शालेय शिक्षण मंत्री, राज्यमंत्री तसेच संबंधित प्रशासकीय व शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. 

आंदोलनाची रूपरेषा व भूमिका

२४ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या एकत्रित सभेत व्यापक व संघटित लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात १ डिसेंबर २०२६ पासून प्रशासकीय व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडणे आणि अध्यापन कार्यात अडथळा ठरणारी अनावश्यक ऑनलाइन कामे व ॲप्स हाताळणे बंद केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत व संवैधानिक अधिकार असून, शाळांचे अस्तित्व टिकवणे, शिक्षकांच्या न्याय्य मागण्या सोडवणे आणि त्यांना शिकवण्यासाठी पुरेसा वेळ व अनुकूल वातावरण देणे, हाच या निर्णयामागचा मुख्य हेतू असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. 

या निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डायट (DIET) प्राचार्य, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), गट विकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांनाही माहितीसाठी व आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. शासनाने या प्रश्नांची न्याय्य सोडवणूक करून सकारात्मक व ठोस निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT