आचरा: मालवण तालुक्यातील कालावलं खाडीपत्रात तळाशील किनारी होतं असलेल्या बेकायदेशीर वाळू उपसा विरोधात तळाशील ग्रामस्थ गेली आठ ते दहा वर्षे आंदोलन करत आहेत. मात्र त्यांना महसूल प्रशासनाकडून कोणताही न्याय मिळत नाही. बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या बोटी ग्रामस्थांनी पकडून दिल्यावर महसूल प्रशासन शुल्लक दंड आकारून बोटी सोडून देत आहे. एखादी घटना घडल्यानंतर वाळू माफियांची मर्जी सांभाळण्यासाठी खोट्या केसेस दाखल करून गंभीर गुन्ह्यांची कलमे प्रशासाकडून ग्रामस्थांवर लावली जात आहेत.
आपली वस्ती, माड बागायती वाचवण्यासाठी धपडणाऱ्या ग्रामस्थांचा आवाज दडपण्यासाठी खोटे केसेस मध्ये अडकवून ग्रामस्थांचा आवाज दबवण्याचा डाव प्रशासन रचत आहे. असा आरोप तळाशील ग्रामस्थांनी केला असून आठ दिवसात मालवण तहसीलदार कार्यलयासमोर येत्या आठ दिवसात ठिय्या आंदोलन छेडणार असल्याचा निर्धार तळाशील येथे शुक्रवारी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी केला आहे.
यावेळी तळाशील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळुसकर, तोडवळीचे माजी सरपंच जयहरी कोचरेकर, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र मेस्त, भोपाळ मालंडकर, ताता टिकम, संजय तारी, भरत कोचरेकर, केशर जुवाटकर, महेश तारी, धर्माजी कोचरेकर, मनीषा तारी, मंजुषा चोडणेकर, रिया कोचरेकर, जान्वी पराडकर, तसेच महिलां ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
कालावल खाडी पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा विरोधात तळाशील ग्रामस्थ सातत्याने आंदोलन करत आहेत. मात्र मुजोर महसूल प्रशासन त्यावर डोळेझाक करत आहे. सातत्याने वादाचे प्रसंग उद्भवत असताना महसूल प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. काही दिवसापूर्वी असेच मासेमारीसाठी गेलेल्या युवकांनी बेकायदेशीर उपसा करणाऱ्या बोटींना हुसकावून लावले त्यावेळी वाळूकामगार पळून गेलेत तेव्हा एक कामगार पाण्यात पडून मृत्यू पावला या घटनेशी तळाशील येथील युवकांचा कोणताही संबंध नसताना प्रशासनाने तळाशील येथील युवकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्याना अडकवले आहे.
वाळू टेंडरचे गट हे साधारणपणे वाघेश्वर मंदिर पासून ते पुढे भगवंतगड पर्यंत सुरु होतात. मात्र असे असताना उपसा हा बेकायदेशीपणे रेवंडी तसेच तळाशील खाडिकिनारी केला जातो वाळू टेंडर प्रोसेस करताना तोंडवळी ग्रामपंचायला कोणताही महसूल मिळत नाही . वाळू टेंडरच्या परवानग्या एकीकडे उपसा मात्र दुसरीकडे असा प्रकार महसूलच्या आशीर्वादाने होत असल्याचा आरोप यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी केला. त्याचबरोबर परवाना नसलेल्या बोटी खाडीत राजरोस वापरल्या जात आहेत. याकडे जाणीवपूर्वक बंदर विभाग दुर्लक्ष करत आहे स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन करून आशा बोटी पकडून दिल्या त्यावेळी अधिकाऱ्यांनी कारवाईचे नाटक करत नाममात्र दंड करून अशा बोटी सोडून दिल्या जात आहेत. मर्यादित वाळू परवाने असताना दिवसाला दोनशेहुन अधिक डम्पर वाळू वाहतूक करत आहेत असा आरोप ग्रामस्थांनी केला.
या अन्यायाविरोधात तळाशील येथील ग्रामस्थ आंदोलन उभारत आहेत. या लढ्यासाठी सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी तसेच पर्यावरणप्रेमी संस्था यांचीही साथ मिळावी अशी साद तळाशील ग्रामस्थांनी यावेळी घातली आहे.