कणकवली ः ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद वाक्य जोपासत खेडोपाडी सेवा देणार्या एसटीला सातत्याने अनेक आव्हाने आणि अडचणींचा सामना करावा लागत आहे. सिंधुदुर्ग विभागाचा विचार करता या विभागात चालकांची सुमारे 106 तर वाहकांची सुमारे 165 पदे प्रदीर्घ काळ रिक्त असून त्याचा परिणाम नियमित शेड्युलवर होत आहे. या विभागाला सुमारे 444 शेड्यूल मंजूर असून चालक, वाहकांच्या रिक्त पदांमुळे ही शेड्यूल संख्या सद्यस्थितीत 376 पर्यंत खाली आली आहे.
विशेष म्हणजे दरदिवशी प्रत्येक आगारात प्रत्येकी 25 चालक, वाहक असे मिळून विभागात सुमारे 350 चालक, वाहकांना डबल ड्युटी करावी लागत आहे. एकूणच या रिक्त पदांचा फटका विभागाच्या उत्पन्नावरही होत आहे. महामंडळाकडून मात्र कायमस्वरूपी पदे भरण्यापेक्षा कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याचा विचार सुरू आहे. एसटीचा कारभार गतिमान करण्यासाठी चालक आणि वाहक पदे महत्त्वाची आहेत. मात्र ही महत्त्वाचीच पदे रिक्त असल्याने कारभार हाकताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सिंधुदुर्ग विभागाचा विचार करता चालकांची सुमारे 775 पदे मंजूर असून आणखी सुमारे 106 चालकांची आवश्यकता आहे तर वाहकांची सुमारे 766 पदे मंजूर असून आणखी सुमारे 165 वाहकांची आवश्यकता आहे. मात्र सिंधुदुर्ग विभागात 2019 पासून चालक, वाहकांची भरती झालेली नाही. त्यामुळे असलेल्या चालक, वाहकांना डबल ड्युटी देवून शेड्युल चालवावे लागत आहे. डबल ड्युटी करणार्या चालक, वाहकांना नियमाप्रमाणे अधिकचा भत्ता द्यावा लागत आहे.
एकीकडे एसटी महामंडळाचा तोटा वाढत असताना दुसरीकडे रिक्त पदांचाही फटका रिक्त महामंडाळाच्या उत्पन्नावर होत आहे. त्याशिवाय शेड्युलवरही परिणाम होत असल्याने प्रवासी आणि लोकप्रतिनिधींच्या रोषास प्रशासनाला सामोरे जावे लागते. शासन स्तरावरुन कायमस्वरुपी भरतीबाबत केवळ घोषणा केल्या जातात,परंतु गेल्या 5 ते 6 वर्षात भरतीच झालेली नाही. विश्वसनीय सुत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार महामंडळ स्तरावर कंत्राटी चालक, वाहकांची पदे भरण्याचा विचार सुरु आहे. मात्र अशी कंत्राटी पध्दतीने भरती एसटीच्या सुरक्षित प्रवासाच्या विश्वासाला तडा देवू शकते. शिवशाही बसेसमध्येही काही वर्षापूर्वी अशीच कंत्राटी पध्दतीने चालकांची भरती करण्यात आली होती मात्र शिवशाही बसेसच्या वाढत्या अपघातांमुळे कंत्राटी चालक नियुक्त करणे किती चुकीचे होते हे स्पष्ट झाले. त्यामुळे एसटीमध्ये चालक, वाहकांची स्थानिकांना प्राधान्य देत भरती होणे आवश्यक आहे. एसटीच्या चालक, वाहकांना नियमित प्रशिक्षण दिले जाते शिवाय महामंडाळाचा तो अधिकृत कर्मचारी असल्याने जबाबदारीचे भान त्यांना असते. त्यामुळे एसटी महामंडळातील चालक, वाहकांची भरती प्राधान्याने होणे आवश्यक बनले आहे. चालक, वाहकांची रिक्त पदे भरली गेली तर महामंडळाच्या शेड्युलमध्ये वाढ होवून उत्पन्नातही भर पडणार आहे.
सिंधुदुर्ग विभागाकडे सध्यस्थितीत 380 बसेस असून गेल्या वर्षभरात नवीन 55 लालपरी बसेस विभागाला प्राप्त झाल्या आहेत. आणखी 15 नव्या बसेस प्राप्त होणार आहेत. या साध्या बसेस असल्या तरी पुश बॅक सीटींग सुविधा यामध्ये आहे. तर कुडाळ, कणकवली आणि वेंगुर्ले आगाराला प्रत्येकी 150 सीएनजी बसेस मंजूर आहेत. त्यापैकी वेंगुर्ले आणि कुडाळ आगाराला 77 सीएनजी बसेस परिवर्तन करुन प्राप्त झाल्या आहेत. तर कणकवली आगारात सीएनजी पंप झाल्यानंतर या बसेस मिळणार आहेत. अर्थात या सीएनजी बसेस याच विभागाच्या बसेसचे सीएनजी मध्ये परिवर्तन करुन दिल्या जात आहेत. हरित इंधनाच्या या बसेस इकोफ्रेंडली आहेत.