कणकवली : दारूच्या नशेत मुलाने स्वतःच्या वडिलांना बांबूच्या काठीने मारहाण केल्याची घटना कणकवली तालुक्यातील सावडाव गावात घडली आहे. याबाबत अशोक विठोबा वारंग (६७, रा. सावडाव गावठाणवाडी) यांनी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार त्यांचा मुल गा अभिषेक वारंग (३५) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक विठोबा वारंग यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, त्यांचा मोठा मुलगा अभिषेक वारंग याला दारू पिण्याचे व्यसन आहे. लग्न झाल्यानंतर पत्नी त्याला सोडून गेली असून तो सतत दारूच्या नशेत घरात येऊन कुटुंबियांना शिवीगाळ करत असतो.
२५ एप्रिल रोजी रात्री ९ वा.च्या सुमारास अभिषेक दारू पिऊन घरी आला. त्यावेळी घरात वडील अशोक व आई अर्चना उपस्थित होते. जेवणासाठी चिकन घेऊन आल्यावर त्याने अचानक शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर घरातील लाकडी दांड्याने वडिलांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे . आई अर्चना यांनी मध्ये पडून त्यांना सोडवले. या घटनेनंतर अभिषेकने "दोन दिवसांत तुम्हाला संपवतो" अशी धमकी दिल्याचेही वडिलांनी तक्रारीत नमूद केले आहे.
जखमी अशोक वारंग यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतले. या प्रकरणी अभिषेक वारंग याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार सुधीर घारकर करत आहेत.