सावंतवाडी ः सोने -चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. बुधवारी सोन्याचा दर 1 लाख 20 हजार वरून दीड लाख प्रतितोळा झाला. चांदी दीड लाखावरून 3 लाख प्रतिकिलोवर पोहोचली आहे. आता लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे; मात्र सोने-चांदीच्या दराने पुन्हा उसळी घेतल्याने त्याचा परिणाम विवाह कार्यांमध्ये दिसणार आहे. सध्या वारंवार दर वाढत असल्याने सोने-चांदीच्या दुकानांमध्ये गर्दी कमी असल्याचे चित्र आहे.
मकर संक्रांत साजरी झाल्यानंतर 18 जानेवारीपासून विवाह मुहूर्त सुरू होत आहेत. त्यामुळे लग्नसराईला खर्याअर्थाने प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी पुन्हा सोने-चांदीच्या दरात भरघोस वाढ झाली. पूर्वी बाजारात सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 1 लाख 20 हजार होता तो 30 हजारांनी वाढला आहे. त्यामुळे आता नवीन दर दीड लाख रुपये प्रति तोळा असा झाला आहे. तर चांदी दीड लाख प्रति किलो होती, त्यात तब्बल दीड लाख रुपयांची वाढ झाली असून ती तीन लाख रुपये किलो या विक्रमी दरावर पोचली आहे.
लग्नसराई सुरू होत असून सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने लोकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. सोन-चांदीचे दर पुन्हा वाढल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोने-चांदीचे मार्केट मंदावले आहे. खरेदीसाठी दुकानांमध्ये ग्राहक अभावने येत असल्याची परिस्थिती आहे. सातत्याने सोने-चांदीच्या किमती वाढल्याने त्याचा फटका वधु-वर कुटुंबियांना बसत आहे. दागिने बनविणे व खरेदीसाठी येणारे ग्राहकांनी वाढत्या दरांमुळे सोने-चांदीच्या दुकानांकडे पाठ फिरवली आहे. तर बजेट कोलमडल्याने काही लग्नकार्ये पुढे ढकलण्याची वेळ उद्भवली आहे.
सोने-चांदीच्या दरात सहा महिन्यांत तिसर्यांदा वाढ
सोने-चांदीच्या दरात या सहा महिन्यांत झालेली ही तिसरी वाढ आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगोदरच लग्नासाठी मुली मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. कित्येक युवक विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात सोने- चांदीचे दर वाढल्याने त्यांच्या समस्येत आणखी वाढ झाली आहे. यामुळे विवाह कार्य करावे तरी कसे, असा यक्ष प्रश्न लोकांना पडला आहे.