Sawantwadi Shiv Sena Rift
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेतील विकासकामे आणि कारभारावरून सत्ताधारी भाजप व मित्रपक्ष शिवसेनेत मतभेद असल्याची चर्चा सुरू असतानाच, भाजपने यावर स्पष्टीकरण दिले आहे. भाजपचे प्रवक्ते आणि नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी पत्रकार परिषद घेऊन, भाजपच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचे शीतयुद्ध नसल्याचा दावा केला. उलट शिवसेनेच्या नगरसेवकांमध्येच दोन गट असल्याचा आरोप त्यांनी केला.
या पत्रकार परिषदेला भाजप शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नगरसेविका सुकन्या टोपले, संतोष तळवणेकर आणि भाजप सरचिटणीस दिलीप भालेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
ॲड. भांबुरे म्हणाले की, भाजपचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी तांत्रिक मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली होती. झालेली विकासकामे योग्य पद्धतीने झाली असून, आगामी कामेही पारदर्शकतेने व्हावीत, ही त्यांची भूमिका होती. कामे बंद पाडण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. मात्र, त्यांच्या भूमिकेवर शिवसेनेचे नगरसेवक संजू परब आणि गटनेते बाबू कुडतरकर यांनी टीका केली.
गटनेत्यांनी भूमिका मांडल्यानंतर संजू परब यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेण्याची गरज काय होती, असा सवाल करत भांबुरे यांनी शिवसेनेतील अंतर्गत मतभेदांवर बोट ठेवले. परस्परविरोधी भूमिका मांडल्या जात असल्याने शिवसेनेतच गटबाजी असल्याचे दिसून येत असल्याचा दावा त्यांनी केला.
भाजपमधील कथित वादांच्या चर्चांचे खंडन करताना भांबुरे म्हणाले की, भाजपमध्ये सर्वजण एकाच विचाराने काम करतात. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांमध्ये कोणतेही शीत, उष्ण किंवा मध्यम युद्ध सुरू नाही. सावंतवाडीचा सत्यानाश होत असल्याची विधाने माजी नगराध्यक्षांना शोभणारी नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने काही जण शहरात चुकीचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये, असा टोला लगावत त्यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
नळपाणी योजनेसह शहरातील विविध विकासकामांना भाजपचा विरोध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. जनहित आणि अंत्योदयाचा विचार करून विकासकामे केली जात असल्याचे भांबुरे यांनी सांगितले. शहरातील कथित रजिस्टर गहाण प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, संबंधित व्यक्तीला अटक झाल्याने या प्रकरणावर अधिक भाष्य करणे योग्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, सावंतवाडी नगरपरिषदेतील विविध विकासकामे आणि कारभारावरून भाजप व शिवसेनेतील संबंधांबाबत शहरात चर्चा सुरू असून, या राजकीय घडामोडींमुळे नगरपरिषदेतील वातावरण चर्चेचा विषय ठरले आहे.