गैरव्यवहार प्रकरण Pudhari News Network
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : सावंतवाडी न. प. पाणीपुरवठा योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी कर्मचाऱ्यांवर गुन्हा

महत्त्वाची नोंदवही परस्पर गायब करून तिची विल्‍हेवाट लावल्याचा आ­­­­रोप

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतील तब्बल ४५ लाख रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात अत्यंत महत्त्वाची नोंदवही परस्पर गायब करून त्याची विल्हेवाट लावल्याप्रकरणी पालिकेचा प्लंबर भारत बाबू लाखे याच्याविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सावंतवाडी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात ४५ लाखांचा अपहार झाल्याचा थेट आरोप झाल्याने गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडले आहेत. या गंभीर प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, संबंधित गैरव्यवहाराशी निगडित मूळ दस्तऐवज आणि पुरावे नष्ट करण्याचा कट रचला गेल्याचे समोर येत आहे. पालिकेचे कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी रजेवर असल्याचा­­­­ फायदा उठवून, संशयित भरत लाखे यांनी पाणीपुरवठा विभागातील वस्तू नोंद आणि वापराची दोन अत्यंत महत्त्वाची रजिस्टर्स पिशवीत भरून लंपास केली. रजिस्टरमधील नोंदी कोणाला दिसू नयेत आणि अपहाराचा पुरावा नष्ट व्हावा या उद्देशानेच ही विल्हेवाट लावल्याचा संशय आहे. या गंभीर प्रकारानंतर संजय गोविंद पोईपकर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी भारत लाखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

यामागे केवळ संबंधित कर्मचाऱ्याचा हात आहे की आणखी कोणाचा या दिशेने पोलिस तपास करत आहेत. या प्रकरणात बडे मासे जाळ्यात अडकण्याची भीती व्यक्त केली जात असून, लवकरच त्याना ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT