सावंतवाडी बाजारपेठेतील चप्पल दुकान जळून खाक 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Fire : सावंतवाडी बाजारपेठेतील चप्पल दुकान जळून खाक; लाखोंचे नुकसान

नवरात्रौत्सव मंडळातील कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे अन्य दुकाने बचावली

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : सावंतवाडी मुख्य बाजारपेठेतील हॉटेल मॅंगो परिसरात असलेल्या संजू निपाणीकर यांच्या चप्पल दुकानाला मंगळवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या दुर्घटनेत दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. बाजारपेठ नवरात्रौत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे व तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

​मंगळवारी पहाटे ३ वा. च्या सुमारास ही आग लागली. शेजारील सलून दुकानातील बाळू वेंगुर्लेकर यांना दुकानाला आग लागल्याचे पाहून त्यांनी तत्काळ बाजारपेठ नवरात्रौत्सव मंडळाच्या मंडपात उपस्थित कार्यकर्त्यांना याची माहिती दिली. यानंतर मंडळाचे २० ते २५ कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी धावले आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. यातील नंदू गांवकर यांनी नगरपालिकेचा अग्निशामक बंब घटनास्थळी आणला. कार्यकर्त्यांच्या आणि अग्निशामक बंबाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यामुळे लगतची अन्य दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून बचावली.

आग आटोक्यात आणण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सत्यवान बांदेकर, राजू धारपवार, रामा गावडे, अर्चित पोकळे, चिरायू टोपले, सुरेश वाडकर, श्री. मुळीक, प्रसाद देऊलकर, देवबा देऊलकर, जुगनू देऊलकर, शैलेश गवंडळकर, प्रसाद वागळे, राकेश चितारी आणि अमित वेंगुर्लेकर यांनी मेहनत घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT