सावंतवाडी : दुबईतील आलिशान हॉटेलमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून सावंतवाडीतील ५ सुशिक्षित तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोलवाळ-गोवा येथील सिद्धार्थ नावाच्या युवकाने प्रत्येकी ४५ हजार रुपये उकळून बनावट व्हिसा दिल्याचे निष्पन्न झाले असून, सध्या हा भामटा फरार झाला आहे. याप्रकरणी फसवणूक झालेले तरुण सावंतवाडी पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत.
संशयित सिद्धार्थ याने सावंतवाडीतील तरुणांना दुबईतील एका नामांकित हॉटेलमध्ये त्वरित नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्याच्या विश्वासाला बळी पडून तरुणांनी त्याला प्रत्येकी ४५ हजार रुपये दिले. रक्कम उकळल्यानंतर संशयिताने काही दिवस टाळाटाळ करत तरुणांचे फोन उचलणे बंद केले. तरुणांनी पैशांसाठी आणि नोकरीसाठी वारंवार तगादा लावल्यानंतर, संशय उडू नये म्हणून त्याने बनावट व्हिसा तयार करून तरुणांच्या व्हॉटस्ॲपवर पाठवला. एवढेच नव्हे, तर लवकरात लवकर पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट काढून कामावर रुजू व्हा, असा बनावही त्याने रचला.
ऑनलाईन तपासणीत बनावट व्हिसा उघड
संशयिताच्या अती घाईमुळे तरुणांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी व्हॉटस्ॲपवर आलेला व्हिसा ऑनलाईन प्रणालीद्वारे तपासला असता, तो पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. फसवणूक उघडकीस येताच तरुणांनी संशयिताला जाब विचारला. त्यावेळी त्याने पैसे परत देण्याचे आश्वासन दिले; मात्र प्रत्यक्षात एकही रुपया न देता त्याने हात वर केले आणि तो अचानक गायब झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संतप्त तरुणांनी सावंतवाडी पोलिसांत धाव घेत कायदेशीर कारवाईची तयारी सुरू केली आहे. परदेशात नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित तरुणांना लुटणाऱ्या अशा भामट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.