कुत्र्यांच्या तावडीतून सांबराच्या पिल्लाची सुटका 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : कुत्र्यांच्या तावडीतून सांबराच्या पिल्लाची सुटका

माजगाव येथील घटना; वन विभागाकडून नैसर्गिक अधिवासात मुक्तता

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : माजगाव दत्तमंदिर परिसरात कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या एका सांबराच्या पिल्लाची वन विभाग आणि स्थानिकांच्या सतर्कतेमुळे सुरक्षित सुटका करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर हे पिल्लू सुखरूप असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी १०.३० वा. च्या सुमारास घडली.

माजगाव दत्तमंदिर परिसरातील राजू भोगण यांच्या घरालगत मोकाट कुत्र्यांनी एका तीन वर्षे वयाच्या सांबराच्या पिल्लाचा पाठलाग करून त्याला अडवून ठेवले होते. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक युवक आणि ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून सांबराच्या पिल्लाला कुत्र्यांच्या तावडीतून सुखरूप ताब्यात घेतले. बचाव मोहिमेनंतर वन विभागाने तत्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून पिल्लाची वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीत पिल्लाला कोणतीही दुखापत झाली नसल्याची खात्री झाल्यावर त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडून देण्यात आले.

या यशस्वी बचाव मोहिमेत वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक सुशांत चोथे, वनविभागाचे जलद कृती दल प्रमुख रामचंद्र उर्फ बबन रेडकर यांच्यासह शुभम कळसुलकर, गोपाळ सावंत, कृष्णा पारधी आणि रामचंद्र जंगले यांनी योगदान दिले. या संपूर्ण मोहिमेदरम्यान स्थानिक नागरिक आणि युवकांनी वन विभागाला मोलाचे सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT