कुडाळ : कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर नजीक असलेल्या कृष्णाई सुपर मार्केटसमोर मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. महिंद्रा पिकअप जीपने अचानक लावलेल्या ब्रेकमुळे मागून येणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक बसून पुंडलिक नारायण नाईक (६५, रा. आंबडपाल-नाईकवाडी) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी जीप चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवारी रात्री ९.२५ वा. च्या सुमारास पिकअप जीप चालक भगवान नामदेव गवंडे (रा. जालना) हा काळपनाका महामार्गाच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. कृष्णाई मार्केटसमोर रस्त्यावर कोणताही अडथळा नसताना चालकाने अचानक गाडीच्या मधोमध ब्रेक लावला. याचवेळी मागून आपल्या दुचाकीने येणाऱ्या पुंडलिक नाईक यांची दुचाकी जीपवर पाठीमागून आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, नाईक रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने नाईक यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर उपचार सुरू केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या घटनेची फिर्याद प्रथमेश पंढरीनाथ लाकम (रा. भैरववाडी) यांनी दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक जयदीप पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
पुंडलिक नाईक हे टाळंबा पाटबंधारे प्रकल्पातील सेवानिवृत्त कर्मचारी होते. ते आंबडपाल ग्रामपंचायत सदस्य व रिक्षा व्यावसायिक प्रसाद नाईक यांचे वडील होत. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, सरपंच महेश परब, उपसरपंच गोट्या चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी रुग्णालयात गर्दी केली होती. बुधवारी दुपारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर आंबडपाल येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.