कुडाळ : कुडाळ शहरातील जुन्या जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या शासकीय जागेवर बेकायदेशीरपणे सुरू असलेला फास्ट फूड स्टॉल महसूल प्रशासनाने कारवाई करत हटवला. उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी त्या ठिकाणी जात तात्काळ जागा खाली करण्याच्या सुचना दिल्या.त्या सूचनेनंतर व्यावसायिकाने स्वतःहून स्टॉलचे साहित्य हटवून जागा रिकामी केली.
ही जागा शासकीय असल्याने तिचा व्यावसायिक वापर होत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले होते. सुमारे २० दिवसांपूर्वी मंडळ अधिकाऱ्यांनी स्टॉल हटवण्याबाबत तोंडी सूचना दिल्या होत्या. मात्र, तरीही स्टॉल सुरूच राहिल्याने कुडाळच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी महसूल पथकासह प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आणि स्टॉल तात्काळ बंद करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यानंतर व्यावसायिकाने तेथून साहित्य हलवले, या मोकळ्या शासकीय जागेवर भविष्यात कुडाळ उपविभागीय अधिकारी कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत बांधली जाणार आहे. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थाने उभारण्याचे नियोजन आहे. या विकासकामांसाठी ही जागा अतिक्रमणमुक्त करणे गरजेचे होते. शासकीय जागेवर अनधिकृत वापर किंवा अतिक्रमण केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा महसूल विभागाने दिला आहे.