करुळ-भुईबावडा घाट 
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : करुळ-भुईबावडा घाटांची दुरुस्ती कधी?

पुढारी वृत्तसेवा
मारुती कांबळे

वैभववाडी : गेले कित्येक महिने तालुक्यातील करुळ व भुईबावडा दोन्हीही घाटमार्ग वाहतुकीस बंद असल्यामुळे, त्याचा मोठा फटका प्रवासी, वाहतूकदार यांच्यासह व्यापार्‍यांना बसत आहे. भुईबावडा घाटात अतिवृष्टीमुळे कोसळलेल्या मोरीचे बांधकाम अद्यापही सुरू असून, अजून काही दिवस वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. करुळ घाट मात्र अनिश्चित काळासाठी बंद आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण यांना जोडणार्‍या या घाटांची दुरुस्ती कधी पूर्ण होणार? असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, भुईबावडा घाट पुन्हा 10 ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. सध्या फक्त छोटया वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.

एकमेकांना पर्यायी मार्ग

पश्चिम महाराष्ट्र, कोकण यांना जोडणारे भुईबावडा व करूळ घाट हे दोन्ही घाट वैभववाडी तालुक्यात येतात. या दोन्हीही घाटातून मोठया प्रमाणात वाहतूक होते. करूळ घाटात वाहतुकीला अडथळा झाला तर त्याला पर्यायी मार्ग म्हणून भुईबावडा घाटाकडे पाहिले जाते. भुईबावडा घाटात अडथळा आला तर करूळ घाटाचा पर्याय होता. मात्र करूळ घाटाच्या नूतनीकरण, काँक्रिटीकरण कामासाठी 22 जानेवारीपासून तब्बल नऊ महिने हा घाट मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. या दरम्यान प्रवासी वाहतुकीसह जड व अवजड वाहतूकही वैभववाडी - उंबर्डे - भुईबावडा घाटमार्गे सुरू होती. यावर्षी पावसाळ्यात भुईबावडा घाटाने चांगली साथ दिली होती. मात्र 26 सप्टेंबर रोजी घाट परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे घाटाची दैना झाली. त्याशिवाय एक मोरी कोसळली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने घाटात ठिकठिकाणी कोसळलेल्या दरडी हटवून रस्ता मोकळा केला. सध्या घाटातून फक्त मोटरसायकल व हलकी वाहने सुरू असून मोरी कोसळल्यामुळे एसटी बससह जड व अवजड वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. कोसळलेल्या मोरीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र आणखी काही दिवस वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातून जाणारे हे दोन्हीही घाट मार्ग बंद असल्यामुळे प्रवाशी, वाहतूकदार, व्यापारी यांची मोठी गैरसोय झाली आहे.

तब्बल नऊ महिने तळेरे - कोल्हापूर महामार्ग बंद

करुळ घाटाच्या नूतनीकरणाच्या नावाखाली तब्बल नऊ महिने तळेरे-कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग इतके महिने बंद ठेवता येतो का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

करुळ घाटाचे काम धिम्या गतीने

करूळ घाट बंद असूनही ज्या गतीने काम अपेक्षित आहे त्या गतीने होताना दिसत नाही. त्यातच पहिल्या पावसात कोसळलेल्या संरक्षण भिंती व रस्ता यामुळे या संपूर्ण कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. हे संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे आरोप लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून केले जात आहेत. प्रशासनाने सुरुवातीला दिलेली तीन महिन्याची मुदत वाढवत वाढवत नेऊन नऊ महिने झाले तरी घाटाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. घाट कधी सुरू होणार याबाबत प्रशासनाकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. त्यामुळे करूळ घाट अनिश्चित काळासाठी बंद आहे. याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.

भुईबावडा घाटातून प्रवास करणे जीवघेणे

करूळ घाट बंद करताना जिल्हाधिकारी यांनी करूळ घाटातील जड व अवजड वाहतूक ही फोंडाघाट तर प्रवासी व हलकी वाहतूकही भुईबावडा घाटातून सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र हे आदेश धाब्यावर बसवत, प्रत्यक्षात भुईबावडा घाटाची क्षमता नसताही या घाटातून प्रवासी वाहतुकीसह जड व अति अवजड वाहनांची वाहतूक गेले नऊ महिने सुरू आहे. या अति अवजड वाहतुकीमुळे वैभववाडी-उंबर्डे-भुईबावडा दरम्यान दोन वर्षांपूर्वी केलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. अवजड वाहतुकीमुळे ठिकठिकाणी रस्ता खचत चालला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे जीव घेणे ठरत आहे. या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करावी. अनेक लोकप्रतिनिधींनी मागणी करूनही अति अवजड वाहतूक सुरूच ठेवण्यात आली आहे. या अवजड वाहतुकीमुळे वैभववाडी ते भुईबावडा दरम्यान गेल्या तीन-चार महिन्यात चार एसटी बसला अपघात झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र भविष्यात जीवित हानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. प्रशासने हे दोन्हीही घाट लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी प्रवाशी, वाहतूकदार, व्यापारी यांच्याकडून करण्यात येत आहे.

प्रशासनाच्या हलगर्जीपणा : व्याप-यांना फटका

करुळ घाट बंदचा सर्वाधिक फटका या मार्गांवरील वैभववाडी शहरातील व्यापार्‍यांना बसला आहे. करूळ ते तळेरेे दरम्यान महामार्गानजीक असलेली अनेक हॉटेल ग्राहकच नसल्यामुळे बंद करण्याची वेळ हॉटेल व्यावसायिकांवर आली आहे. तसेच अन्य व्यापारावरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. याबाबत वाहतूकदार व व्यापार्‍यांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाच्या वेळकाढू व हलगर्जीपणाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

भुईबावडा घाटातील वाहतूक 10 ऑक्टोबरपर्यंत बंदच

भुईबावडा घाटातील कोसळलेल्या मोरीचे बांधकाम सुरू असून, सुरुवातीला 29 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते; मात्र काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पुन्हा 10 ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सध्या फक्त छोट्या वाहनांना परवानगी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT