Water Scarcity Pudhari
सिंधुदुर्ग

Sindhudurg Rain update : ऑक्टोबरअखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ २,२०५ मि.मी. पाऊस

नद्यांसह धरण-तलावांच्या पातळीतही कमालीची घट; धरणांमध्ये केवळ ८४ टक्के पाणीसाठा

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : यंदा ‘अल निनो’च्या प्रभावामुळे सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिली. दरवर्षी सप्टेंबरअखेरपर्यंत सर्वसाधारणपणे जिल्ह्यात सरासरी ३ हजार मिलिमीटरपर्यंत पाऊस पडत असे. मात्र, यंदा ऑक्टोबर सरला तरी केवळ सरासरी २,२०५.६ मि.मी. एवढाच पाऊस झाला आहे, तोही सरासरीच्या केवळ ७१ टक्केच आहे. दुसरीकडे, कमी झालेला पाऊस आणि कडक उन्हामुळे जलाशयांच्या पाणी पातळीतही झपाट्याने घट होत आहे. जिल्ह्यातील धरण आणि तलावांमध्ये ऑक्टोबरअखेर केवळ ८५ टक्‍के पाणीसाठा शिल्लक आहे.

पावसावर ‘अल निनो’चा प्रभाव यंदा सुरुवातीपासूनच राहिला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये सरासरी सर्वसाधारणपणे २,९४० मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता, तो यंदा सरासरी २१५१.१ मि.मी. एवढाच झाला. तोही सरासरीच्या केवळ ७३ टक्के एवढा होता, तर ३० ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात केवळ ५४.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंत जिल्ह्यात सरासरी २,२०५.६ मिलिमीटर एवढाच पाऊस झाला आहे. यामध्ये देवगड तालुक्यात १,९८८.९ मि.मी., मालवण १,६४५ मि.मी., सावंतवाडी २,५२१.५ मि.मी., वेंगुर्ला १,६४६.२ मि.मी., कणकवली २,४५३.२ मि.मी., कुडाळ २,२५३.२ मि.मी., वैभववाडी २,६६४.९ मि.मी. आणि दोडामार्ग तालुक्यात सर्वधिक २,७९८.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत सरासरी ७४० मि.मी. पाऊस यंदा कमी झाला आहे. गतवर्षी ऑक्टोबरपर्यंत २,९४० मि.मी. पाऊस झाला होता; मात्र यंदा ऑक्टोबर सरला तरी पाऊस ही सरासरी गाठू शकलेला नाही. यंदा कोकण विभागामध्येही ३० ऑक्टोबरपर्यंत सरासरी २,६२६.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोकण विभागात सप्टेंबरअखेरपर्यंत २,५९६ मिलिमीटर पाऊस झाला होता. तर गतवर्षी याच तारखेपर्यंत कोकण विभागात २,८८१ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा कोकण भागातही सरासरी ३०० मि.मी. पाऊस कमी झाला आहे.

धरण, तलावांमध्ये ८४ टक्के पाणीसाठा

यंदा कमी झालेला पाऊस आणि वाढत्या उष्णतेमुळे नद्यांसह धरण आणि तलावांच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. ऑक्टोबरमध्येच अनेक नद्यांची पात्रे कोरडी पडत आहेत, तर धरण आणि तलावांमध्येही पाणी पातळीत कमालीची घट होत आहे. जिल्ह्यातील सर्व धरण, तलाव, मृद व जलसंधारणाच्या प्रकल्पांमध्ये ३० ऑक्टोबरअखेरपर्यंत केवळ ८४.५१ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत ९१.७३ टक्के, तर २०२४ मध्ये याच तारखेपर्यंत ९२.५९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT