सिंधुदुर्ग : अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपलेल्या लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज झाला आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाण्यासह विविध भागांतून कोकण रेल्वे, एसटी, खासगी आराम बस आणि खासगी गाड्यांनी शनिवारी सिंधुदुर्गात लाखोंच्या संख्येने चाकरमानी दाखल झाले. मोठ्या संख्येने एसटी बसेस आणि खासगी गाड्या रस्त्यावर आल्याने कणकवलीसह जिल्ह्याच्या अनेक भागांत सकाळच्या सत्रात वाहतूक कोंडीचा सामना चाकरमान्यांसह सर्वांनाच करावा लागला.
चाकरमान्यांच्या आगमनामुळे लहान-मोठ्या सर्वच बाजारपेठांमध्ये शनिवारी मोठी गर्दी झाली होती. बाप्पांच्या मंडपी सजावटीसाठी लागणाऱ्या रानफुलांसह भाजीपाला, फळे, फुले, किराणासह आरास सजावट साहित्याने बाजारपेठा सजल्या असून विविध प्रकारची खरेदी झाली. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याने मुंबईकर चाकमानी वीस-वीस तासांचा प्रवास करून आपल्या गावी दाखल होत आहेत.
एरव्ही नऊ-दहा तासांत गावाकडचे घर गाठता येते. यावर्षी गर्दी वाढणार याचा अंदाज होताच. शनिवारी सकाळी मेंगलोर एक्सप्रेस, तुतारी, कोकणकन्या, सावंतवाडी एक्सप्रेस अशा सर्वच रेल्वे गाड्यांमधून मोठ्या संख्येने चाकरमानी आले तर एसटी महामंडळाच्या बसेस, खासगी ट्रॅव्हल्स आणि खासगी गाड्यांनीही चाकरमानी आले. त्यामुळे दिवसभर रेल्वेस्थानके, बसस्थानके चाकरमान्यांच्या गर्दीने फुलून गेली होती.
कणकवली रेल्वेस्थानकावर आलेल्या चाकरमान्यांचे कोकण रेल्वे महामंडळ आणि स्थानिक स्टॉलधारकांनी तुतारी वाजवून स्वागत केले. चाकरमान्यांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय पथकेही सज्ज होती. किरकोळ ताप, सर्दी, बीपी, शुगर याची तपासणी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केली. त्यानंतर रिक्षा, एसटी बसेस आणि खासगी गाड्यांनी चाकरमानी आपापल्या गावी पोहोचले.
बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी
शनिवारी खरेदीसाठी चाकरमानी बाजारपेठांमध्ये आले, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठा गजबजल्या होत्या. शहाळी, केळींसह विविध प्रकारची फळे, फुले, रानफुले विक्रीसाठी आली होती. सर्वच बाजारपेठांमध्ये किराणा माल व अन्य साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पहायला मिळाली. पोलिस यंत्रणेने छोट्या बाजारपेठेंमध्येही होमगार्डसह पोलिस कर्मचारी तैनात केले होते. तरीही काही प्रमाणात वाहतूक कोंडी ठिकठिकाणी झाली.