कुडाळ : मुलांच्या शालेय परीक्षा संपून सुट्टीचा हंगाम सुरू होताच मे महिन्यात मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी कोकणात आपल्या गावी दाखल होऊ लागले आहेत. मुंबई, पुण्यासह विविध शहरांत नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेले कोकणवासीय मे महिन्यात सुट्टीच्या काळात मोठ्या संख्येने आपल्या गावी परतत असून, जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या प्रमुख रेल्वेस्थानकांसह सर्वच स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी कोकण रेल्वे, खासगी आराम बसेस तसेच खासगी वाहनांमधून जिल्ह्यात दाखल होत आहेत. मुंबईहून कोकणाकडे धावणाऱ्या जवळपास सर्वच रेल्वे गाड्यांचे पुढील महिनाभराचे आरक्षण आधीच फुल्ल झाले असून, अनेक प्रवासी वेटिंग तिकिटावर प्रवास करत आहेत. त्यामुळे पॅसेंजरसह रेल्वे गाड्या अक्षरश: हाऊसफुल्ल गर्दीत धावत आहेत. जनरल बोगीत हाऊसफुल्ल गर्दीत पाहायला मिळत आहे. तर स्लीपर कोच मध्येही प्रवाशांची गर्दी होत असून, कन्फर्म तिकीट नसल्याने वेटींग तिकिटावर खाली बसून प्रवाशी मोठ्या प्रमाणात गावाकडे दाखल होत असल्याचे चित्र रेल्वेगाड्यांत पाहायला मिळत आहे. पुढील महिनाभर मुंबईहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण आधीच फुल्ल झाले आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीलाच सुट्टीचा हंगाम जोरात सुरू झाल्याने गावी जाण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत आहे. अनेकांना कन्फर्म तिकीट न मिळाल्याने तात्काळ (तत्काल) व वेटिंगवरच प्रवास करावा लागत आहे. परिणामी, रेल्वे स्थानकांपासून बसस्थानकांपर्यंत सर्वत्र चाकरमान्यांची मोठी वर्दळ दिसून येत आहे. दरम्यान, गावाकडे जाण्यासाठी तिकिटांच्या वाढत्या मागणीचा फायदा घेत खासगी आराम बसेसच्या तिकीट दरात प्रचंड वाढ झाल्याचे चित्र आहे. एरव्ही १ हजार ते १२०० रुपयांत मिळणारे तिकीट सध्या दुप्पट-तिप्पट दराने विकले जात आहे. विशेषतः स्लीपर कोचसाठी तब्बल ३५०० रुपयांपर्यंत भाडे आकारले जात असल्याने प्रवाशांची आर्थिक लुबाडणूक होत आहे.
दोनच दिवसांपूर्वी पनवेल-सावंतवाडी मार्गावर एका स्लीपर कोचसाठी सुमारे ३५०० रुपये दर सांगण्यात आला गावागावातील लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम आणि विविध सामाजिक उपक्र म या निमित्त चाकरमानी गावी दाखल होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गावे गजबजून गेली आहेत. दुसरीकडे वाढलेल्या प्रवासखर्चामुळे सामान्य चाकरमान्यांवर आर्थिक ताण वाढला असून, प्रशासनाने खासगी बस तिकीट दरांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.