आतुरता लाडक्या बाप्पांच्या आगमनाची..! Pudhari Photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : आतुरता लाडक्या बाप्पांच्या आगमनाची..!

कोकणच्या महाउत्सवाची घराघरांत लगबग

पुढारी वृत्तसेवा

अजित सावंत

सिंधुदुर्ग : गणेशोत्सव संपूर्ण जगभरात साजरा होत असला तरी कोकणातील गणेशोत्सव एक वैशिष्ट्यपूर्ण 'महाउत्सव' म्हणून प्रत्येक घरोघरी साजरा होतो. कोकणातील घराघरात आता या महाउत्सवाची जोरदार तयारी आणि लगबग सुरू झाली आहे. गणेश चतुर्थी अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली असून लाडक्या बाप्पांच्या आगमनाची आतुरता सर्वच गणेश भक्तांना लागली आहे. या महाउत्सवासाठी कोकणातील सर्वच बाजारपेठा विविध प्रकारच्या साहित्याने सजल्या असून बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी वर्दळ वाढली आहे. चाकरमानी गावी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. बाप्पांच्या या महाउत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चैतन्यमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

यंदा १४ सप्टेंबरला गणेश चतुर्थी असून, त्यानंतर पुढील ११, २१ दिवस गणेशोत्सवाचा माहोल असणार आहे. कोकणातील प्रत्येक घराघरात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. या उत्सवासाठी मुंबई, पुण्यासह विविध भागात नोकरी धंद्यानिमित्त स्थिरावलेले चाकरमानी लाखोंच्या संख्येने कोकणात आपल्या गावी दाखल होतात, हे कोकणच्या गणेशोत्सवाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. 'गणपतीला गावी जायचं' या एका ओढीवर कोकणातील चाकरमानी गणेशोत्सवाची वर्षभर वाट पाहत असतो. पूर्वपरंपरा आणि आधुनिकतेचा मेळ घालत हा उत्सव साजरा केला जातो. अवघ्या चार ते पाच दिवसांवर आलेल्या या महाउत्सवाची लगबग घरोघरी सुरू झाली आहे. घरांची साफसफाई, रंगरंगोटी, आरासीसह विविध प्रकारच्या साहित्याची खरेदी अशी कामे सुरू झाली आहेत. एरवी वर्षभर बंद घरे बाप्पांच्या या उत्सवाला आवर्जून उघडली जातात. घरादारांना एक वेगळीच झळाळी येते.

पूर्वी मातीच्या भिंतीना लाल मातीचा गिलावा काढला जात असे, तद्‌नंतर डिस्टेंपर कलर आले, कालौघात आता घरे चिरेबंदी झाली आहेत, प्लास्टर भिंतीना ऑइलपेंट, ऑईल बॉण्ड किंवा तत्सम कलर काढले जातात. घरांच्या रंगरंगोटीबरोबरच आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली जाते. पूर्वी चायनामेड विद्युत तोरणे वापरले जात असत मात्र आता इंडियामेंड विद्युत तोरणांना गणेश भक्तांची पसंती आहे. बाप्पांच्या मांडवीला नैसर्गिक आरास फार शोभून दिसते, ती आरास केली जाते. परंतु त्याचबरोबर इतर विविध प्रकारची सजावट प्रत्येक गणेशभक्त आपापल्या परीने करत असतो.

फळे, फुले, भाजीपाला, सजावट साहित्याने बाजारपेठा फुलल्या

बाप्पांच्या उत्सवासाठी कोकणातील सर्वच बाजारपेठा फुलल्या आहेत. विविध प्रकारची फळे, फुले, भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्‍याचबरोबर गावठी काकड्या, चिबूड, दोडकी, पडवळ, कारली, भेंडे अशा विविध प्रकारच्या गावठी भाज्याही विक्रीसाठी बाजारात आल्‍या आहेत. आरासीसाठी लागणारी नैसर्गिक फळे, फुले, विद्युत तोरणे, फुलांच्या माळा, विद्युत रोषणाईचे साहित्य, किराणा माल, विविध प्रकारचे रंग, रांगोळ्या, फटाके, गोडधोड पदार्थ अशा विविध प्रकारचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे. बाजारात आता खरेदीसाठी गणेश भक्‍तांची लगबग सुरु झाली आहे. गणेशोत्‍सव कालावधीत कोट्यावधी रुपयांची उलाढाल होणार आहे.

वाद्य कारागीर आणि मूर्तिकारांचे युद्धपातळीवर काम

अवघ्या चार दिवसांवर बाप्पांचे आगमन येऊन ठेपल्याने वाद्य कारागीर आणि मूर्तिकारांचे युध्दपातळीवर काम सुरु झाले आहे. गणेश मूर्ती रंगविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्‍यासाठी हजारो हात रात्रंदिवस राबत आहेत. त्‍याचबरोबर आरती भजनासाठी लागणाऱ्या तबला, मृदंग दुरूस्‍ती कारागिरांचे कामही रात्रंदिवस सुरू आहे.

पोलिस यंत्रणा, जिल्हा प्रशासन सज्ज

कोकणातील प्रत्‍येक घरोघरी साजरा होणारा गणेशोत्सव आणि लाखोंच्या संख्येने येणारे चाकरमानी या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा, जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. वाहतूक व्यवस्‍थेचे नियोजन, पार्किंग व्‍यवस्था याबाबतची सज्जता त्‍या त्‍या ठिकाणच्या स्‍थानिक स्‍वराज्य संस्‍थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT