सावंतवाडी : प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या सोनुर्ली येथील श्री माऊली देवीचा वार्षिक उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून मंदिर परिसरात व्यापारी, व्यावसायिक तसेच ग्रामस्थांची मोठी गजबज पाहायला मिळत आहे. उत्सवानिमित्त संपूर्ण गावात धार्मिक वातावरण तयार झाले आहे. मंडप व विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर झळाळून निघाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठी जत्रा म्हणून सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीची ‘लोंटागण जत्रा’ ओळखली जाते. यावर्षी बुधवार २५ नोव्हेंबर रोजी हा जत्रोत्सव साजरा होत आहे. अवघ्या एका दिवसावर आलेल्या या जत्रोत्सवाची तयारी जवळपास पूर्णत्वास आली आहे. उर्वरीत कामे पूर्ण करण्यासाठी देवस्थान कमिटी कडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. देवीच्या दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरामध्ये भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सर्वांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी दर्शन रांगेचे नियोजन करण्यात आले आहे. लोटांगण घडणाऱ्या भाविकांसाठी आंघोळीची सोयही देवस्थान कमिटीकडून करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे यावर्षी संपूर्ण मंदिर परिसरामध्ये सिमेंट काँक्रीटचे काम करण्यात आले आहे. देवीला लोटांगणे घातली जातात तो परिसर मातीचा ठेवून पलीकडचा संपूर्ण भाग सिमेंट काँक्रीटने सुशोभित करण्यात आला आहे. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराच्या आतमध्ये फुलांची आरास करण्यात येत आहे.
मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुकान व्यवसायिक तसेच हॉटेल व्यवसायिक व अन्य विविध फुले विक्रेत्या, आईस्क्रीम दुकाने थाटण्यात आली आहेत. दरवर्षी पावसाची शक्यता लक्षात घेता व्यवसायिकांनी प्लास्टिकचे छत मंडपावर टाकले आहे. एस. टी. महामंडळाकडूनही जत्रोत्सवासाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. सावंतवाडी व बांदा आदी बस स्थानकातून या बसेस ठराविक अंतराने सोडण्यात येणार आहेत. पोलिस प्रशासनाने सुद्धा वाहतूक कोंडीवर विशेष लक्ष दिला असून दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. कुठल्याही प्रकारची अडचण आणि व्यत्यय निर्माण होऊ नये यासाठी देवस्थान कमिटीकडून खबरदारी घेतली जात आहे.