Sindhudurg News 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News|खासदार, पालकमंत्र्यांच्या परस्‍परविरोधी भूमिकांमुळे जनतेत संभ्रम

सुशांत नाईक : अणुऊर्जा प्रकल्‍पाबाबत सरकारने भूमिका स्‍पष्‍ट करावी

पुढारी वृत्तसेवा

देवगड : सिंधुदुर्गातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुद्द्यावर खासदार आणि पालकमंत्री यांच्या परस्परविरोधी भूमिकांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला असून सरकार आणि सत्ताधाऱ्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी करत युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. देवगड शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, दादा सावंत, तुषार धुरी, गुरुदास धुवाळी, विकास कोयंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. सुशांत नाईक म्हणाले, देवगड दौऱ्यात खा. नारायण राणे यांनी अणुऊर्जा प्रकल्पाला समर्थन दर्शवले, तर दुसऱ्याच दिवशी पालकमंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पाबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. एका घरातील एक खासदार प्रकल्पाचे समर्थन करतो, तर दुसरे मंत्री प्रकल्पाबाबत माहिती नसल्याचे सांगतात, ही बाब जनतेच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे. राज्य सरकारने प्रस्तावित प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करार (एमओयू) केला असून त्या स्वाक्षरी सोहळ्याचे छायाचित्र उपलब्ध आहे. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देवगड तालुक्यातील तीन ठिकाणांसाठी सुमारे ४ लाख ५० हजार कोटी रुपयांच्या अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात एमओयू झाल्याचा दावा करत त्यासंबंधीची कागदपत्रे आणि छायाचित्रे पत्रकार परिषदेत सादर करण्यात आली.

सुशांत नाईक म्हणाले, काही महिन्यांपूर्वी संबंधित परिसरात भू-सर्वेक्षणाचे कामही सुरू होते. कोणत्याही मोठ्या प्रकल्पासाठी सर्वेक्षणाशिवाय एमओयू होत नाही. असे सर्व घडामोडी सुरू असताना पालकमंत्री प्रकल्पाबाबत माहिती नसल्याचे सांगत असून, व्हॉट्सॲपवरील संदेशांवर विश्वास ठेवून ग्रामसभा घेऊ नका, असे आवाहन करत आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यात विसंगती असून जनतेची दिशाभूल होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

आजगाव परिसरात सर्वेक्षणाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविल्यानंतर पालकमंत्र्यांनी आपली भूमिका मवाळ केली. जनतेचा विरोध पाहून भूमिका बदलणारे पालकमंत्री हे सरड्यापेक्षाही अधिक वेगाने रंग बदलत असल्याची टीका नाईक यांनी केली.खासदारांच्या समर्थनानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका झाली. त्यानंतर एकाने समर्थनाची भूमिका घ्यायची आणि दुसऱ्याने मवाळ भूमिका घेत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा, असा प्रकार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जाण्याची पालकमंत्र्यांची हिंमत नाही. स्वतःचा स्वाभिमान पक्ष टिकवता आला नाही म्हणून त्यांनी तो भाजपमध्ये विलीन केला. त्यामुळे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने निर्णय घेतील त्याच पद्धतीने पालकमंत्री वागतील. देवगडमधील प्रस्तावित प्रकल्पाबाबतही ते मुख्यमंत्री सांगतील त्याच दिशेने काम करतील, असा दावा नाईक यांनी केला.

एका कुटुंबाकडे जिल्ह्यातील सर्व अधिकार केंद्रित झाल्यामुळे ‘हम करे सो कायदा’अशा पद्धतीने कारभार सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. मात्र देवगडची जनता डोक्यावर घेते तसेच गरज पडल्यास जमिनीवरही आणू शकते, हे लोकशाहीत लोकांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. ज्या दिवशी देवगडची जनता अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात रस्त्यावर उतरेल, त्या दिवशी शिवसेना त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्हाला पर्यावरणाला हानी पोहोचविणारे प्रकल्प नकोत, तर पर्यावरणपूरक आणि स्थानिकांना रोजगार देणारे प्रकल्प हवेत. कोकणचा हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे. त्यासाठी संशोधन केंद्र, प्रक्रिया उद्योग, काजू आणि आंबा बागायतदारांना बळ देणारे प्रकल्प सरकारने उभारावेत. मात्र शेतकऱ्यांच्या अशा मागण्यांकडे दुर्लक्ष करून मोठे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका त्यांनी केली.

आंबा बागायतदारांच्या आंदोलनानंतर सरकारला झुकावे लागले आणि नुकसानभरपाई जाहीर करावी लागली. मात्र ही घोषणा सरकारची उदारता नसून शेतकऱ्यांच्या संघर्षाचे यश असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री दोघेही जनतेला आश्वासने देतात; परंतु योग्य वेळी भूमिका बदलतात. त्यामुळे भविष्यात अणुऊर्जा प्रकल्प आणणार नाही असे सांगितले जात असले, तरी योग्य वेळी तो जनतेवर लादला जाणार नाही याची खात्री देता येत नाही. या प्रकल्पाला विरोध करण्याची ताकद पालकमंत्र्यांमध्ये नसून ते मुख्यमंत्री सांगतील त्याच भूमिकेत राहतील, असा आरोप नाईक यांनी केला. पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांनी एका बाजूला प्रकल्पाबाबत माहिती नसल्याचे सांगितले, तर दुसऱ्या बाजूला कोणताही प्रकल्प सौर, पवन किंवा इतर येऊ शकतो, असेही वक्तव्य केले. या परस्परविरोधी विधानांमुळे जनतेची दिशाभूल होत असल्याचे नाईक म्हणाले.

आंबा बागायतदारांच्या जलसमाधी आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा

शासनाने जाहीर केलेली नुकसानभरपाई अपुरी असल्याच्या निषेधार्थ आंबा बागायतदारांनी ३ जुलै रोजी आयोजित केलेल्या जलसमाधी आंदोलनाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याची घोषणा सुशांत नाईक यांनी केली. आतापर्यंत आंबा बागायतदारांनी केलेल्या प्रत्येक आंदोलनाला आम्ही साथ दिली असून, प्रकल्पविरोधी जनआंदोलनांनाही आमचा पाठिंबा कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT