सावंतवाडी : सत्तेत एकत्र आहोत याचं किमान भान समोरच्याने ठेवायला हवं. शासन कोणालाही फुकट जमिनी वाटत नाही. जर जागा हवी असेल तर रीतसर शासकीय दर भरा, चर्चा करा आणि मार्ग काढा. पण स्वतः बिझनेस करून पैसे कमवायचे आणि शासकीय जागा फुकटात मागायची, असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, अशा शब्दांत शिवसेना नेते आ.नीलेश राणे यांनी जि. प. सदस्य मायकल डिसोझा यांचे नाव न घेता त्यांची थेट कानउघाडणी केली.
सावंतवाडीत एका कार्यक्रमानिमित्त आले असता आ. राणे यांनी पत्रकारांशी बोलताना या वादावर ही पहिली आणि सर्वात मोठी प्रतिक्रिया दिली. शनिवारी मायकल डिसोझा यांनी पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्षांवर टक्केवारीचे आणि हुकूमशाहीचे गंभीर आरोप केले होते. यावर बोट ठेवत आ. नीलेश राणे म्हणाले, मी आज काही लोकांची पत्रकार परिषद पाहिली. तुम्ही जागा कोणाकडे मागत आहात? शासनाकडे. अशा परिस्थितीत जर तुम्ही शासकीय जागा मागत असाल, तर त्याचे नियम पाळा, पैसे भरा.तुम्ही तिथे क्लासेस चालवणार, कंपनी चालवणार, स्वतः पैसे कमावणार आणि यातून शासनाला काहीच देणार नाही, हे कसं चालेल?
उद्या उठून कोणीही येईल आणि सांगेल की मी २५० लोकांना रोजगार देतो, मला फुकट भूखंड द्या. मग असा भूखंड देता येतो का? शासनामध्ये असा कोणताही नियम किंवा पद्धत आहे का? त्यामुळे हे असले स्टंट आणि प्रकार पूर्णपणे चुकीचे आहेत.