सिंधुदुर्ग : कुडाळ-पिंगुळी येथील वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि पावशी बेलनदी रोडवर ९ ग्रॅमची सोनसाखळीची जबरी चोरी करणारा सराईत चोरटा पद्मनाभ रामचंद्र कशाळेकर (वय ४७, रा. वरची कुंभारवाडी) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरंबद केल्याची माहिती पोलिस अधीक्षक मोहन दहीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली
दहीकर म्हणाले, १२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी पावशी बेलनदीवाडी येथील अनिता अशोक अंधारी (५०) या कुडाळ येथे जाण्यासाठी पावशी-घावनळे रोडवर एसटीच्या प्रतीक्षेत एकट्याच उभ्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञाताने त्यांना घावनळे मठाकडे जाणारा रस्ता बहाणा करत बोलण्यात गुंतवून ठेवून त्यांच्या गळ्यातील ९ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ हिसकावून पोबारा केला होता. या माळेची किंमत अंदाजे ३ लाख ३५ हजार रुपये एवढी आहेे.
याबाबत श्रीमती अंधारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुडाळ पोलिस ठाण्यात १३ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या पूर्वी या संशयिताने ९ सप्टें. २०२६ रोजी पिंगुळी- सराफदारवाडी, ता. कुडाळ येथे एका वृद्ध महिलेच्या घरी मुख्य दरवाजावर थाप मारून दरवाजा उघडताच त्या महिलेच्या तोंडावर स्प्रे मारून तिच्या गळ्यातील २४ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला होता. याबाबतही त्याच्यावर कुडाळ पोलिसांत गुन्हा नोंद आहे.
या दोन्ही सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचे गांभीर्य पाहून तपास करणेकरिता पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर व अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांनी समांतर तपास करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेस आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळी पथके तयार करून त्याद्वारे तपास सुरू होता.
या पथकाने तपास व चौकशी करून, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे सोनसाखळी चोरी करणारा संशयित निष्षान्न केला. त्याला सापळा रचून शिताफीने MIDC कुडाळ परिसरातून ताब्यात घेतले. त्याने वर नमूद दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून एकूण १५ हजार ५00 रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्याचे कामी वापरलेले दुचाकी, हेल्मेट व पेन रिलीफ स्प्रे मुद्देमाल हस्तगत केला आहे.