कुडाळ : सिंधुदुर्ग हा आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल सुविधा आणि एआयच्या दिशेने वाटचाल करणारा देशातील अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र अशा जिल्ह्यातच सुरक्षा यंत्रणेचा कणा मानली जाणारी सीसीटीव्ही व्यवस्था बंद असणे दुर्दैव आहे. महिला मुंबईतून लाखो रूपयांचे दागिने सुरक्षित घेऊन येतात, मात्र कुडाळ बसस्थानकात लाखोंचे दागिने चोरीला जातात. कोरोना काळात रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी अलर्ट असणारी सीसीटीव्ही यंत्रणा आता चोरांवर लक्ष ठेवण्यात कुचकामी का? अशा अनेक प्रश्नांचा भडिमार उबाठा शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कुडाळ पोलिसांवर केला.
कुडाळ शहरातील बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा, वाढते चोरीचे प्रकार, वाहतूक कोंढी, अमली पदार्थांची तस्करी आणि सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न यावरून उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलिस ठाण्याला भेट देत पोलिस अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. नगरपंचायत, एसटी प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्त बैठक घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. शहरातील अनेक महत्त्वाच्या चौकांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी लाखो रुपये खर्च करून बसवलेली सीसीटीव्ही यंत्रणा सध्या बंद आहे. चोरट्यांना शहरातील सुरक्षा व्यवस्था कमकुवत झाल्याची माहिती असून, त्याचाच फायदा घेत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप, या पदाधिकाऱ्यांनी केला.
आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त जिल्ह्यातच सीसीटीव्ही व्यवस्था बंद पडणे, हे दुर्दैवी असल्याची टीका करण्यात आली. कुडाळ एसटी बसस्थानकात सीसीटीव्ही यंत्रणा नसल्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. बसस्थानकात चोरीच्या घटना घडून हा लाखोंचा ऐवज लंपास होतो, याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करण्यात आला. बसस्थानकातील घड्याळ देखील अनेकदा नादुरुस्त होत असल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. शहरात गांजा विक्री व सेवनासारखे गंभीर प्रकार अधूनमधून समोर येत आहेत. अशा स्थितीत चोरांचा सुळसुळाट रोखणार कोण? असा प्रश्न पदाधिकाऱ्यांनी केला.
शहरातील पेट्रोल सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा रस्त्यावर लागत असल्याने वाहतूक कोंडी, वाद आणि अपघाताचा धोका वाढत आहे. यावर वाहतूक विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली. पालकमंत्री, जिल्हा नियोजन समिती किंवा संबंधित विभागामार्फत निधी उपलब्ध करून शहरातील बंद सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावर शहरातील सीसीटीव्ही आणि इतर सुरक्षाविषयक प्रश्नांबाबतचे प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवले असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. कुडाळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले. उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट, शहर निरिक्षक सुशील चिंदरकर, अमित राणे, गुरु गडकर, धिरेंद्र चव्हाण व संतोष अडूरकर आदी उपस्थित होते.