कुडाळ : सातबारा उताऱ्यावर नोंद करण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेले पिंगुळी येथील ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र काळू खेताडे यांना ओरोस येथील मा. विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात अटकेत असलेल्या खेताडे यांना दिलासा मिळाला आहे.
आरोपीच्या विरुद्ध सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी रक्कम रुपये ५ हजाराची लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २३ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग यांच्याकडे तक्रार दाखल केली.तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. तलाठी कार्यालयात भेट न झाल्याने तक्रारदाराने खेताडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. त्यानुसार कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील रेल्वे ब्रिजजवळ ५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांच्याविरुद्ध कारवाई केली. या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला न्यायालयासमोर हजर करून पुढील तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी केली होती. रिमांड रिपोर्टमध्ये लाचेच्या मागणीची पडताळणी, सापळा कारवाई आणि गुन्ह्याच्या पुढील तपासासंदर्भातील मुद्दे नमूद करण्यात आले होते.
दरम्यान, आरोपीच्या वतीने जामीन अर्ज दाखल करण्यात आला. सुनावणीदरम्यान आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. सुहास सावंत यांनी आरोपीच्या कोठडीतील चौकशीची आवश्यकता दर्शविणारी कोणतीही सबळ कारणे पोलिसांकडून देण्यात आलेली नसल्याचा मुद्दा मांडला. तसेच आरोपीला अटक करताना सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले नसल्याचा युक्तिवादही बचाव पक्षातर्फे करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर बचाव पक्षाने मांडलेले मुद्दे ग्राह्य धरून ओरोस येथील मा. विशेष न्यायालयाने जितेंद्र काळू खेताडे यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. सुहास सावंत, ॲड. निलांगी सावंत, ॲड. उमा सावंत, ॲड. रसिका सावंत, ॲड. संदेश कोएगावकर व ॲड. धनश्री टेंबुलकर यांनी काम पाहिले.