पिंगुळी रेल्वे ट्रॅकवर सापडलेला मृतदेह गावातीलच तरुणाचा! 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Crime : पिंगुळी रेल्वे ट्रॅकवर सापडलेला मृतदेह गावातीलच तरुणाचा!

अपघात की जीवन संपविले याबाबत कुडाळ पोलिसांकडून तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : पिंगुळी-राऊळवाडी (डॉन बॉस्को नजीक) येथील रेल्वे ट्रॅकवर शनिवारी सायंकाळी आढळलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली असून श्रीपाद ऊर्फ पप्या कोकाटे (48, रा. पिंगुळी-चिंदरकरवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हा अपघात की आत्महत्या याबाबतचा तपास कुडाळ पोलिस करीत आहेत. श्रीकृष्ण हे वाहनाच्या पत्रा पेंटिंगचा व्यवसाय करायचे. ते ‌‘पप्या‌’ या टोपण नावाने परिचित होते.

शनिवारी दुपारी 3.30 ते सायंकाळी 4 वा. च्या सुमारास कोकण रेल्वेमार्गावर पिंगुळी-राऊळवाडी येथील रेल्वे ट्रॅकवर अनोळखी पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळला. या अनोळखी व्यक्तीचे डोके व अन्य काही अवयव छिन्न विच्छिन्न झाले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटणे कठीण झाले होते. कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सदर मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात ठेवला होता. त्यादिवशी सायंकाळी उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. श्रीकृष्ण कोकाटे रात्री उशिरापर्यंत घरी आले नाहीत. त्यांची शोधाशोध सुरू असताना पिंगुळी येथील रेल्वे ट्रॅकवर घडलेली घटना रविवारी सकाळी त्यांच्या नातेवाईकांना समजली. त्यानंतर सदर अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहावरील टी शर्ट, पांढऱ्या रंगाची हाफ पॅन्ट तसेच घटनास्थळी आढळलेले चप्पल यावरून तो मृतदेह श्रीकृष्ण यांचा असल्याचे नातेवाईकांनी सांगितले, अशी माहिती कुडाळ पोलिस ठाण्यातून देण्यात आली.

हा अपघात आहे की आत्महत्या आहे. याबाबतचा तपास कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस उपनिरीक्षक ममता जाधव करीत आहेत. श्रीकृष्ण कोकाटे वाहनांच्या पत्रा पेंटिंगचे उत्कृष्ट कारागीर होते. काही वर्षे त्याचा कुडाळ-उद्यमनगर येथे वाहनाच्या पत्रा पेंटींगचा व्यवसाय होता. त्यानंतर त्यांनी पिंगुळी- चिंदरकरवाडी येथील आपल्या घरानजीक हा व्यवसाय सुरू केला होता. या घटनेने पिंगुळी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ व अन्य परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT