कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी-गोंधळपूर मुस्लिमवाडी येथील मैदानावर बैलांच्या झुंजीचे आयोजन करण्यात आल्याचा प्रकार ६ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आला. गोपनीय माहितीच्या आधारे कुडाळ पोलिसांनी या ठिकाणी धडक कारवाई करत झुंजीसाठी आणलेले दोन बैल ताब्यात घेतले. तसेच बैलांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली बोलेरो मॅक्स आणि पिकअप टेम्पो यांच्यावरही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोन्ही बैलांचे मालक, टेम्पो चालक, आयोजक यांच्यासह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही बैलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने कुडाळ पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पिंगुळी-गोंधळपूर मुस्लिमवाडी येथील मैदानावर बैलांच्या झुंजी सुरू असल्याची गोपनीय माहिती कुडाळ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मैदानावर बैलांची झुंज सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मात्र, पोलीस आल्याचे समजताच मैदानावर जमलेल्या लोकांच्या गर्दीतील अनेकांनी तेथून पळ काढला.
यावेळी सहाय्यक पोलीस फौजदार कोळेकर यांनी पिंगुळी-गोंधळपूरचे पोलीस पाटील शंकर सातार्डेकर यांना घटनास्थळी बोलावून घेतले. चौकशीदरम्यान या बैल झुंजीचे आयोजन गुलाब अब्दुल लतीफ शेख (रा. पिंगुळी, गोंधळपूर मुस्लिमवाडी) याने केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तातडीने सुरू असलेली बैलांची झुंज थांबवून दोन्ही बैलांना सुरक्षितरीत्या बांधून ठेवले.
यावेळी सुभाष मनोहर खाडे (वय ४७, रा. टेंबे खाडेवाडी, जि. रत्नागिरी) यांनी सफेद रंगाचा बैल आपल्या मालकीचा असल्याचे सांगितले. या बैलाची किंमत ५० हजार रुपये आहे. तर दुसरा करड्या रंगाचा बैल मुन्ना मुजावर (रा. नेरूर-दुर्गवाड, ता. कुडाळ) यांच्या मालकीचा असून त्याचीही किंमत ५० हजार रुपये असल्याचे स्पष्ट झाले. अशा प्रकारे दोन्ही बैलांची एकूण किंमत एक लाख रुपये आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गुलाब अब्दुल लतीफ शेख, बैलमालक सुभाष मनोहर खाडे, बैलमालक मुन्ना मुजावर आणि टेम्पोचालक सर्वेश सुरेश भातडे (रा. रत्नागिरी) व अन्य एक टेम्पो चालक यांनी संगनमताने बैलांच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवाना न घेता बोलेरो मॅक्स व पिकअप टेम्पोमधून बैल मैदानावर आणले होते.
पैसे मिळविण्याच्या उद्देशाने बैलांच्या झुंजीचे आयोजन करण्यात आले होते. झुंजीदरम्यान बैलांना दुखापत होण्याची शक्यता माहीत असतानाही त्यांना अमानुषपणे झुंजविण्यात येत असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.या प्रकरणी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(m), ११(१)(n), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम १२(अ) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३(५) अन्वये संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, जखमी होण्याचा धोका असलेल्या या बैलांना पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. दोन्ही बैलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने कुडाळ पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.