घरात घुसलेल्या खवले मांजराला वन कर्मचाऱ्यांकडून जीवदान 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : घरात घुसलेल्या खवले मांजराला वन कर्मचाऱ्यांकडून जीवदान

दोडामार्ग-मार्ले येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : मोर्ले येथील रमेश गवस यांच्या घरात पहाटे ३.३० वा.च्या सुमारास खवले मांजर आढळून आल्याने कुटुंबीयांची चांगलीच तारांबळ उडाली. प्रसंगावधान राखत गवस कुटुंबीयांनी त्याला सुरक्षितपणे पकडून वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने खवले मांजराचा ताबा घेत त्याची नैसर्गिक अधिवासात सुखरूप सुटका केली.

मंगळवारी पहाटे ३.३० वा.च्या सुमारास रमेश गवस यांच्या पत्नी रेश्मा गवस यांना किचनमधून काहीतरी आवाज ऐकू आला. सुरुवातीला घरात उंदीर असावा, असा अंदाज आल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, काही वेळाने पुन्हा आवाज आल्याने त्यांनी किचनमध्ये जाऊन पाहिले असता फ्रीजखाली खवले मांजर लपल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

खवले मांजर दिसताच रेश्मा गवस घाबरून मोठ्याने ओरडल्या. त्यांचा आवाज ऐकून रमेश गवस धावत किचनमध्ये आले. त्यांनी प्रसंगावधान राखत खवले मांजराला सुरक्षितपणे पकडून स्टीलच्या टाकीत ठेवले आणि तातडीने वन विभागाला याबाबत माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी संभाजी पाटील व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गवस कुटुंबीयांनी खवले मांजर वन विभागाच्या ताब्यात दिले. वनाधिकाऱ्यांनी त्याची पाहणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडले. माजी सरपंच गोपाळ गवस, संतोष मोर्ये, रमाकांत गवस यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गवस कुटुंबीयांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे आणि वन्यजीवाबाबत घेतलेल्या संवेदनशील भूमिकेचे कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT