नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमध्ये साखर, मीठ किंवा चरबीचे प्रमाण जास्त असल्यास ग्राहकांना स्पष्ट इशारा देण्यासाठी भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) लाल रंगाच्या षटकोनी आकाराचे चेतावणी चिन्ह लावण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या चिन्हावर ‘हाय फॅट-हाय सॉल्ट’, ‘हाय सॉल्ट-हाय शुगर’ आणि ‘हाय फॅट-हाय शुगर’ असे लिहिलेले असेल.
एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान एफएसएसएआयने प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती दिली. न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. पॅकबंद खाद्यपदार्थांच्या पुढील बाजूस ग्राहकांना सहज समजेल अशा स्वरूपात इशारा देण्याची मागणी ‘3एस अँड अवर हेल्थ सोसायटी’ने दाखल केलेल्या याचिकेत केली होती. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचे इशारा लेबल लागू करण्याबाबत एफएसएसएआयच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते.
दोन किंवा अधिक घटकांचे प्रमाण जास्त असल्यास इशारा
एफएसएसएआयच्या प्रस्तावानुसार अन्नपदार्थांमध्ये अतिरिक्त संतृप्त चरबी, अतिरिक्त साखर आणि मीठ या तीनपैकी दोन किंवा अधिक घटकांचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्यास पॅकेटच्या पुढील बाजूस लाल रंगाचे इशारा चिन्ह लावले जाईल.
पोषण तक्त्यापेक्षा मोठ्या अक्षरांत इशारा
हा इशारा पॅकेटच्या मागील बाजूस असलेल्या पोषणविषयक माहितीच्या तक्त्यात वापरल्या जाणाऱ्या अक्षरांपेक्षा किमान एक पॉईंट मोठ्या आकारात देण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे ग्राहकांना उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्यातील आरोग्यासाठी चिंताजनक घटकांची माहिती सहजपणे मिळू शकेल.
दोन टप्प्यांत अंमलबजावणी
एफएसएसएआयने ही व्यवस्था दोन टप्प्यांत लागू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. पहिल्या टप्प्यात अतिरिक्त संतृप्त चरबी, साखर आणि मीठ या तीनपैकी दोन किंवा अधिक घटकांचे प्रमाण जास्त असलेल्या खाद्यपदार्थांवर इशारा लागू करण्यात येईल. काही विशिष्ट साखरयुक्त पेयांचाही यामध्ये समावेश असेल. दुसऱ्या टप्प्यात या तीनपैकी केवळ एका घटकाचे प्रमाण जास्त असलेल्या खाद्यपदार्थांवरही इशारा चिन्ह लागू करण्याचा प्रस्ताव आहे.
उद्योगांसाठी वेळ
टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यामागे ग्राहकांमध्ये या व्यवस्थेबाबत स्वीकारार्हता निर्माण करणे आणि खाद्यउद्योगांना त्यांच्या उत्पादनांच्या संरचनेत आवश्यक बदल करण्यासाठी वेळ देणे हा उद्देश असल्याचे एफएसएसएआयने म्हटले आहे.
कोणत्या पदार्थांना सूट?
एकाच घटकापासून बनलेले खाद्यपदार्थ तसेच नैसर्गिकरीत्या चरबी, साखर किंवा मिठाचे प्रमाण जास्त असलेले काही पदार्थ या प्रस्तावित नियमांतून वगळण्यात येणार आहेत. तूप, खाद्यतेल, मीठ, साखर, गूळ आणि मध यांसारख्या पदार्थांचा यामध्ये समावेश आहे. मात्र, त्यांच्यावर लागू असलेल्या अन्य अन्न सुरक्षा आणि लेबलिंग नियमांचे पालन करावे लागणार आहे.