आचरा : ओवळीये -जंगमवाडी गावचे रहिवासी सावंतवाडी येथील माध्यमिक शाळेचे शिक्षक सुनील बाबी जंगम (52) यांनी ओवळये - देव साखळी नदीवरील पुलाच्या लोखंडी रेलिंगला नायलॉन दोरीच्या सहायाने गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना सोमवारी सकाळी 6 ते स. 10 वा. दरम्यान घडली आहे. याबाबतची खबर त्यांची पत्नी रेशमा सुनील जंगम यांनी आचरा पोलिसात दिली.
श्री. जंगम हे सावंतवाडी तालुक्यातील एका हायस्कूलवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी कर्जावर डंपर घेतलेले होते. त्या कर्जाचे हप्ते थकीत झाल्यामुळे ते मानसिक तणावात होते. या तणावातूनच त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याचे त्यांच्या पत्नीने आचरा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. घटनेचा तपास आचरा पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक व्ही. सी. टेंबूलकर करत आहेत.