Vinayak Raut family case Pudhari
सिंधुदुर्ग

Vinayak Raut | ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्गवासीयांची टोल लूट थांबवा; अन्यथा...: विनायक राऊत यांचा इशारा

सिंधुदुर्गवासीयांची टोल लूट थांबवून स्थानिक वाहनधारकांना टोलमधून पूर्ण माफी द्यावी

पुढारी वृत्तसेवा

Osargaon Toll Plaza

​कुडाळ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील ओसरगाव टोल प्लाझा येथे निश्चित करण्यात आलेल्या टोल दरांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. सिंधुदुर्गवासीयांची होणारी टोल लूट त्वरित थांबवून स्थानिक वाहनधारकांना टोलमधून पूर्ण माफी द्यावी, अशी मागणी माजी खासदार व शिवसेना नेते विनायक राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

प्रसिद्धि ​पत्रकात असे नमूद केले आहे की, सिंधुदुर्गनगरी हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने शासकीय कामांसाठी स्थानिक नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना रोज या रस्त्याने ये-जा करावी लागते. अशा वेळी टोल वसुली सुरू झाल्यास जिल्हावासीयांची मोठी आर्थिक लूट होणार आहे.

​रायगडच्या तुलनेत दुप्पट दर आकारणी

रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर लहान वाहनांना पहिल्या टप्प्यात ६५ रुपये टोल आकारला जातो. मात्र, ओसरगाव टोल नाक्यावर लहान वाहनांसाठी तब्बल १२५ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. रायगडमध्ये ६५ रुपये आणि सिंधुदुर्गात १२५ रुपये ही तफावत म्हणजेच ठेकेदार व अधिकाऱ्यांकडून सिंधुदुर्गवासीयांची केलेली उघड लुबाडणूक आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.

​कायमचा टोल नाका बंद करण्यासाठी आंदोलनाची तयारी

ओसरगाव टोल नाक्यावरून प्रवास करणाऱ्या सिंधुदुर्गातील सर्व वाहनांना पूर्ण टोल माफी मिळालीच पाहिजे. तसेच ही लूट न थांबल्यास ओसरगाव टोल नाका कायमचा बंद करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने व जनतेच्या साथीने मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT