सिंधुदुर्गनगरी येथे पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्‍या हस्‍ते भूमिपूजन 
सिंधुदुर्ग

Journalist Housing Project : पत्रकारांच्या हक्काच्या घरासाठी सिंधुदुर्गात ऐतिहासिक पाऊल..!

सिंधुदुर्गनगरी येथे पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्‍या हस्‍ते भूमिपूजन

पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील पत्रकारांना हक्काचे घर मिळावे या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते झालेल्या या भूमिपूजन सोहळ्याला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, पत्रकार संघाचे पदाधिकारी, पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांबद्दलची आत्मीयता व्यक्त करत हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, या कार्यक्रमाचे निमंत्रण खा. नारायण राणे यांनी ही होते. मात्र मीच त्यांना सांगितले की, भूमिपूजनासाठी तुम्ही येऊ नका; पण जेव्हा पत्रकार मित्रांना घरांच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम होईल, तेव्हा तो तुमच्या उपस्थितीतच झाला पाहिजे. कारण पत्रकारांबद्दल खा.राणे यांच्या मनात नेहमीच जिव्हाळा राहिला आहे.

ते पुढे म्हणाले, कोणताही प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि अधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिका महत्त्वाची असते. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी या प्रकल्पासाठी दाखविलेल्या तत्परतेबद्दल त्यांनी विशेष अभिनंदन केले. आई-वडिलांचे संस्कार आणि राणेसाहेबांनी दिलेल्या शिकवणीमुळे निर्णय घेताना माणुसकी डोळ्यासमोर ठेवण्याची सवय लागली. या जिल्ह्यातील लोकांनी आमच्या कुटुंबावर प्रेम केले, आशीर्वाद दिले आणि त्यामुळेच राणे कुटुंब आज राज्यात व देशात ओळख निर्माण करू शकले. हे आम्ही कधीच विसरणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

राणेसाहेबांनी माणसं जोडली; ती टिकवण्याचे काम आम्ही करतोय

ना. नीतेश राणे म्हणाले, राणेसाहेबांची कारकीर्द जवळून पाहणाऱ्या पत्रकारांना माहिती आहे की त्यांनी मुख्यमंत्री, मंत्री आणि पालकमंत्री म्हणून असंख्य लोकांना घरे दिली, नोकऱ्या दिल्या आणि आयुष्य उभे केले. आज महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी असे लोक भेटतात की, ज्यांचे आयुष्य राणेसाहेबांमुळे बदलले. त्यांनी जी माणसं जोडली, त्यांना टिकवणे आणि त्यांचा कारभार पुढे नेणे हेच काम आम्ही करतोय.

नितेश राणे फक्त देण्याचे काम करणार

आपल्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना पालकमंत्री म्हणाले, मी विरोधी पक्षात जास्त काळ काम केले. आंदोलन करून लोकांचे प्रश्न मांडले. पण सत्तेत आल्यानंतर जर ते प्रश्न सोडवले नाहीत तर सत्तेचा उपयोग काय? त्यामुळे या पदावर बसल्यानंतर माझा एकच प्रयत्न आहे. नितेश राणे जिल्ह्याला फक्त देण्याचे काम करणार. आमच्याकडे आउटगोइंग फ्री आहे आणि इनकमिंग बंद आहे. म्हणजेच काही घेण्याचा विषय नाही. लोकांच्या अशक्य वाटणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार. वाडी-वस्त्यांपासून वंचित समाजापर्यंत अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या विषयांमध्ये आम्ही हात घालत आहोत.

प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पूर्ण होईल

पत्रकारांना आश्वस्त करताना त्यांनी सांगितले की, हा प्रकल्प वेळेत आणि उत्कृष्ट दर्जासह पूर्ण होईल. माझ्या सर्व प्रकल्पांवर वैयक्तिक लक्ष असते. भूमिपूजन आज झाले असले तरी काही वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होऊन पत्रकारांना घरांच्या चाव्या देण्याचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात होईल. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते नारायण राणे उपस्थित राहावेत, अशी माझी इच्छा आहे .कार्यक्रमात पत्रकार संघाचे पदाधिकारी, विविध मान्यवर, पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पत्रकारांच्या हक्काच्या घरासाठी सुरू झालेला हा प्रकल्प भविष्यात राज्यासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

सिंधुदुर्ग राज्यातील पहिला जिल्हा

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रकल्पाच्या प्रशासकीय प्रक्रियेची माहिती देताना सांगितले की, आर्थिक अडचणींमुळे हा प्रकल्प काही काळ रखडला होता. मात्र २०२३-२४ नंतर त्याला गती मिळाली. १२ डिसेंबर २०२५ रोजी संस्थेने आवश्यक रक्कम जमा केली. त्यानंतर ५ जानेवारी २०२६ रोजी भूवाटप आदेश देण्यात आला आणि १५ एप्रिल २०२६ रोजी सुधारित आदेशही जारी करण्यात आला. त्या पुढे म्हणाल्या, राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात पत्रकारांसाठी अशा प्रकारचा प्रकल्प उभा राहिलेला नाही. सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा ठरत आहे. पालकमंत्री महोदय नेहमी प्रत्येक क्षेत्रात जिल्हा पहिला राहावा यासाठी प्रयत्नशील असतात आणि त्याचाच हा भाग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT