कणकवली ः क्वॉलिटी कंट्रोलच्या अहवालाबाबत माहिती देताना मंत्री नितेश राणे.  pudhari photo
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : करूळ घाटातून लवकरच एकमार्गी वाहतूक

मंत्री नितेश राणे यांची माहिती ः क्वॉलिटी कंट्रोल अहवालातील त्रुटींची पूर्तता करूनच कार्यवाही

पुढारी वृत्तसेवा

कणकवली ः सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी, हायवे आणि सार्वजनिक बांधकामचे अधिकारी यांच्या समवेत आपण काही दिवसांपूर्वी करूळ घाटमार्गाची एकत्रित पाहणी केली. त्यावेळी आपण रस्त्याचे काम जोपर्यंत दर्जेदार होत नाही, सुरक्षेत कोणतीही कमरता राहणार नाही या सर्व बाबींची तपासणी करूनच घाटमार्ग सुरू व्हावा, अशी भूमिका घेतली होती. तसेच आपण वैयक्तिकपणे क्वॉलिटी कंट्रोलला या रस्त्याची पाहणी करून अहवाल देण्यास सांगितले होते. मुख्य अभियत्यांनीही या कामाची पाहणी केली. क्वॉलिटी कंट्रोलने अहवालात तीन बाबींकडे लक्ष वेधत त्यात सुधारणा करण्यास सांगितले आहे. तो अहवाल आपण जिल्हाधिकार्‍यांकडे देणार आहे. येत्या काही दिवसात त्या त्रुटी दुर करून करूळ घाट मार्गावरून एका बाजूने (लेन) खालून वर अशी वाहतूक सुरू होईल अशी माहिती मत्स्योद्योग व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कणकवलीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी सभापती सुरेश सावंत उपस्थित होते. मंत्री नितेश राणे म्हणाले, घाटमार्ग खुला होत असताना तो पुर्णपणे सुरक्षित असणे आवश्यक आहे, त्यावरून कोणाचाही जीव जाता कामा नये या गोष्टीची खबरदारी घेणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान या घाटमार्गासाठी विरोधकांनी आंदोलने केली, आपल्यावर टिकाटिप्पणीही केली. लोकशाहीत सर्वच पक्षांना जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपण ही टिका वैयक्तिक घेत नाही. विरोधक आणि सत्ताधार्‍यांमध्ये जर संवाद असेल आणि त्यातून जर जनतेचा फायदा होत असेल तर ते स्वागतार्ह आहे. म्हणून विरोधकांनीही ज्या काही सूचना केल्या त्याही खात्याने स्विकारल्या. राजकारण हे राजकाणाच्या बाजुने असावे मात्र नितेश राणेंबरोबर हिशेब चुकता व्हावा म्हणून कोणी वेगळी भूमिका घेत असेल तर ते चालणार नाही. हा रस्ता जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा आहे.जनतेसाठी हा रस्ता सुरक्षित आणि शून्य अपघातांचा असावा ही आपली भूमिका आहे.

28 डिसेंबरला या रस्त्याच्या कामाची आपण पाहणी केल्यानंतर आपण वैयक्तिकपणे क्वॉलिटी कंट्रोल डिपार्टमेंटशी संपर्क साधून अहवाल देण्याची विनंती केली होती. त्यातून काही चुका झाल्या असतील, त्रृटी असतील तर दिसून येईल, कारण हा रस्ता दर्जेदार झाला पाहिजे हे महत्वाचे आहे. 28 डिसेंबर ते आजपर्यत महामार्ग, सा. बां. च्या अधिकार्‍यांनी या कामाची पाहणी केली. अलीकडेच हायवेचे मुख्यअभियंता संतोष शेलार यांनाही आपण या मार्गाची पाहणी करून गुणवत्ता तपासण्याची विनंती केली होती. त्यांनीही पाहणी केली. क्वॉलिटी कंट्रोल डिपार्टमेंटने पाहणी करून आपला अहवाल दिला आहे. तो जिल्हाधिकार्‍यांकडे आपण पाठवून त्यात सुधारणा करण्याबाबत आपण सांगितले आहे. त्याची 100 टक्के पूर्तता केली जाईल. शेवटी समाधानकारक काम होणे आवश्यक असल्याचे मंत्री राणे म्हणाले.

ते पुढे म्हणाले क्वॉलिटी कंट्रोल डिपार्टमेंटने तीन मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. त्यात जी तीव्र वळणे आहेत त्याठीकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने संरक्षक भिंत बांधण्यात यावी. तसेच असलेल्या संरक्षक भिंतीची उंची वाढवून आवश्यक उपाययोजना करावी, डोंगराकडील जी बाजु तोडण्यात आली आहे तेथे लूज मटेरिअल असून ते हटविण्यात यावे. वाहतुक सुरू करण्यापूर्वी सुरक्षेबाबत सुरक्षा तज्ज्ञांचा अहवाल आल्यानंतरच रस्ता सुरक्षित करावा, अशा बाबींकडे लक्ष वेधण्यात आले आहे. जिल्हाधिकारी याबाबत येत्या दोन - तीन दिवसात पुर्तता करून करूळ घाटमार्ग एका बाजुने म्हणजेच सिंधुदुर्गकडून गगनबावड्याकडे खालून वर अशी वाहतूक सुरू होईल, असे मंत्री राणे यांनी सांगितले. ते म्हणाले, या घाटमार्गाचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये, अशा सूचना आपण दिल्या आहेत. आमच्या विरोधकांचीही सुरक्षा तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे विरोधकांनी तेथे जाताना योग्य ती काळजी घ्यावी, वाटल्यास विरोधक आणि आम्ही एकाच गाडीतून घाटमार्गाच्या पाहणीसाठी जाऊ, असा टोलाही मंत्री नितेश राणे यांनी लगावला.

मुंबई ते कोकण जलवाहतूक सुरू करण्याचा विचार

यावेळी मंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना बंदर विकासाबरोबरच जलवाहतूक सुरू करण्याबाबत आपण संबंधित अधिकार्‍यांची बैठक बोलविली आहे. जशी विमानसेवा आणि कोकण रेल्वेने लोकांची सोय होते तशीच सोय मुंबई ते कोकण जलवाहतुकीनेही करता येईल का? याबाबत विचार सुरू आहे. मुंबई ते कोकण जलवाहतूक सुरू करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यास सांगितल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT