नेतर्डेत ओंकार हत्तीचा पुन्हा धुडगूस  
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : नेतर्डेत ओंकार हत्तीचा पुन्हा धुडगूस

केळी-माड बागायतीची नासधूस

पुढारी वृत्तसेवा

बांदा : नेतर्डे गावात ‘ओंकार’ हत्तीने पुन्हा एकदा धुडगूस घालत शेतकरी लाडू गवस यांच्या केळी व माड बागायतीचे मोठे नुकसान केले. मोठ्या कष्टाने उभी केलेली बागायती हत्तीने उद्ध्वस्त केल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. आपल्या बागायतीची झालेली अवस्था पाहून वृद्ध शेतकरी लाडू गवस यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान, ‘आम्हाला नुकसानभरपाई नको, आधी ओंकारला तिलारीच्या नैसर्गिक अधिवासात सोडा,’ अशी आग्रही मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

नेतर्डे-गावठणवाडी येथील लाडू गवस यांनी मोठ्या मेहनतीने मंडल जातीच्या केळीची बागायती उभी केली होती. मात्र, ओंकार हत्तीने या बागायतीत घुसून केळीची झाडे तसेच माडांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. अनेक झाडे उन्मळून पडल्याने गवस यांचे मोठे नुकसान झाले आहे. बागायतीची झालेली वाताहत पाहून त्यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत.

दरम्यान, ओंकार हत्तीचे अचूक लोकेशन देण्यात वनविभाग पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचा आरोप उपसरपंच प्रशांत कामत यांनी केला. हत्तीचा शोध घेण्यासाठी नेमण्यात आलेले हाकारी पथक प्रत्यक्षात हत्तीचा शोध घेण्याऐवजी मंदिर किंवा शेडमध्ये बसून राहत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच पथकासोबत वनविभागाचा कर्मचारीही नियमितपणे उपस्थित नसल्याचा दावा त्यांनी केला. हाकारी पथकात दोडामार्ग तालुक्यातील युवकांचा समावेश आहे. त्यांना परिसराची पुरेशी माहिती नसल्याने हत्तीचा शोध घेण्याऐवजी ते रस्त्यावरच थांबून राहत असल्याचे कामत यांनी सांगितले. सध्या शेतकरी आपल्या बागायतींची साफसफाई करण्यासाठी शेतात जात आहेत. अशा परिस्थितीत ओंकारने एखाद्या शेतकऱ्यावर हल्ला केल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.हत्तीच्या उपद्रवामुळे नुकसान झालेल्या बागायती व शेतीचे तातडीने पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही प्रशांत कामत यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT