कुडाळ : नागपूर येथे 28 सप्टेंबर रोजी होणार्या ओबीसी महामोर्चाला पाठिंबा देण्यासह, हैद्राबाद गॅझेट रद्द करणे, ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी व आरक्षित समाज महासंघाच्या वतीने धरणे आंदोलनास प्रारंभ झाला.
कुडाळ जिजामाता चौकात मंगळवार पासून सुरू झालेल्या या दोन दिवसीय आंदोलनासाठी जिल्ह्यातील विविध भागांतून ओबीसी समाजबांधवांच्या मोठ्या उपस्थितीने आंदोलनस्थळी एकजूट दिसून आली. या आंदोलनात ओबीसी समाज जिल्हाध्यक्ष नितीन वाळके, माजी आ. राजन तेली, काका कुडाळकर, चद्रशेखर उपरकर, नंदन वेंगुर्लेकर, सुनील भोगटे, अतुल बंगे, राजन नाईक, संजय पडते, अभय शिरसाट, समील जळवी, सागर तेली, मंदार शिरसाट, उदय मांजरेकर, राजू गवंडे, आनंद मेस्त्री, हेमंत करंगुटकर, प्रसाद शिरसाट, नगरसेविका श्रेया गवंडे, ज्योती जळवी आदी सर्व पक्षीय ओबीसी नेत्यासह जिल्हाभरातील विविध समाज संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. या आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी आंदोलनात हैद्राबाद गॅझेट रद्द करा, ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य करा, ओबीसी एकजुटीचा विजय असो, उठ ओबीसी जागा हो, संघर्षाचा धागा हो... अशा जोरदार घोषणा देत वातावरण दणाणून गेले.
जिल्हा ओबीसी व आरक्षित समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन वाळके यांनी आंदोलनाच्या मागण्या स्पष्ट करताना सांगितले,ओबीसींची जातीनिहाय जनगणना त्वरित करावी, जुनी पेन्शन योजना सर्व सरकारी-निमसरकारी कर्मचार्यांना पुन्हा लागू करावी, मराठा समाजाचा समावेश ओबीसीत करू नये, थांबलेली मेगा भरती तातडीने सुरू करावी, रिक्त पदांचा अनुशेष त्वरित भरावा, पदोन्नतीतील आरक्षण पुन्हा लागू करावे, आदी मागण्या असल्याचे श्री. वाळके यांनी सांगितले.
ओबीसी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस सुनील भोगटे यांनी सांगितले, हैद्राबाद गॅझेटच्या माध्यमातून मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे. त्यामुळे ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणाला धोका निर्माण झाला आहे. म्हणूनच याविरोधात लढण्यासाठी राज्यभर ओबीसी नेते एकत्र आले असून, नागपूरमध्ये होणार्या महामोर्चाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.