सिंधुदुर्ग : गणेशोत्सव तोंडावर आला आहे. या पार्श्वभूमीवर थकीत बिलांच्या कारणांनी वीज कनेक्शन तोडू नये, अशा सूचना जिल्हा परिषदेचे बांधकाम व वित्त सभापती संतोष साठविलकर यांनी वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना केले आहेत.
ज्यांची वीज बिल भरलेले नाही अशा वीज ग्राहकांचे घरगुती कनेक्शन तोडण्याचे काम वीज महावितरण कंपनीने हाती घेतले आहे. या कामाला गणेशोत्सव जवळ घेताच गती देण्यात आली आहे. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बांधकाम व वित्त सभापती संतोष साठविलकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीज कनेक्शन न तोडण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वीच कनेक्शन तोडायची होती तर ती दोन महिन्यांपूर्वी तोडणे आवश्यक होते. असे न करता ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वीज कनेक्शन तोडणे चुकीचे आहे. गणेशोत्सव हा कोकणातील महत्त्वाचा उत्सव आहे. हा उत्सव घरोघरी साजरा केला जातो. मुंबईकर चाकरमानी ही मोठ्या प्रमाणावर गावाकडे येतात, असे असताना वीज कनेक्शन तोडले जाऊ नये. खरे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज थकीत बिले इतर जिल्ह्यांच्या तुलनेत खूप कमी आहेत. सर्व जिल्ह्यांची वीज थकबाकी काढली तर सिंधुदुर्ग जिल्हा सर्वात शेवटी येईल, इतकी चांगली इथे वसुली आहे. त्याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज चोरी होतं नाही. असे असताना महावितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडू नये. अशा सूचना साठविलकर यांनी केल्या आहेत. या विषयावर बुधवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.