देवगड : महागड्या नवीन मोबाईल खरेदीसाठी आईने पैसे न दिल्याच्या रागातून जामसंडे सहकारनगर येथील आर्यन सुभाष रवंदे (२२) याने आपल्या वाढदिवसादिवशीच राहत्या घरातील हॉलमध्ये गळफास लावून घेतला. त्याला तात्काळ जामसंडे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना तो मयत झाला. ही घटना गुरुवारी रात्री ११.२० वा. च्या सुमारास घडली. घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन हा आईसमवेत जामसंडे सहकारनगर येथे स्वमालकीच्या घरात राहत होता. त्याची आई मोलमजुरीची कामे करते. तर आर्यनही वेल्डींगच्या कामासह इतर मोलमजुरीची कामे करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आईला आर्थिक हातभार लावत असे. आर्यनचा ५ मार्च रोजी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त महागड्या नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी त्याने आपल्या आईकडे पैशांची मागणी केली. परंतु आईने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने त्याने राहत्या घराच्या हॉलमध्ये स्वतःला गळफास लावून घेतला.
ही बाब लक्षात येताच त्याच्या आईने नजीकच्या ग्रामस्थांच्या मदतीने आर्यनला जामसंडे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा पंचनामा देवगड पोलिसांकडून करण्यात आला आहे. देवगड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून आर्यनचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मूळ इंचलकरंजी गावात पार्थिवावर अंत्यससंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली असून घटनेचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत करीत आहेत.