Sindhudurg Accident News 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Accident : चालत्या ट्रॅव्हलरवर कोसळले झाड; चालक गंभीर

आकेरी उंचवळा येथील घटना; १७ प्रवासी बालंबाल बचावले!

पुढारी वृत्तसेवा

​कुडाळ : कुडाळ तालुक्यातील आकेरी-उंचवळा येथे गुरुवारी दुपारी 3 वा.च्या सुमारास एक भीषण दुर्घटना घडली. संथ गतीने चाललेल्या टेम्पो ट्रॅव्हलरवर रस्त्यालगतचे आकेशियाचे अवाढव्य झाड अचानक कोसळले. या दुर्घटनेत वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला असून, वाहनातील इतर १७ प्रवासी सुदैवाने बालंबाल बचावले आहेत. प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला, मात्र या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अक्कलकोटला जात होते प्रवाशी!

पिंगुळी-गुढीपूर येथील काही नागरिक टेम्पो ट्रॅव्हलरने (ट्रॅव्हल्स) अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघाले होते. आकेरी उंचवळा परिसरातून हे वाहन जात असताना, रस्त्याकडेला असलेले आकेशियाचे मोठे झाड थेट वाहनाच्या दर्शनी भागावर (कॅबिनवर) कोसळले. झाडाचा थेट मारा चालकाच्या बाजूने झाल्याने वाहन चालक गंभीररीत्या जखमी झाला. ​अपघाताचा आवाज होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी मोठ्या शिताफीने आणि तातडीने मदतकार्य सुरू करून जखमी चालकाला वाहनातून बाहेर काढले. चालकाला तत्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे हलविण्यात आले आहे. सुदैवाने, गाडीच्या मागील भागात बसलेले

१७ प्रवासी यातून सुखरूप बचावले.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेला प्रशासनाचा हलगर्जीपणा पूर्णपणे जबाबदार आहे.काही दिवसांपूर्वी या भागातील आकेशियाच्या झाडांना आग लागली होती. त्यात या झाडाचा मुळांचा भाग पूर्णपणे जळून खाक झाला होता व झाड कमकुवत झाले होते. गुरुवारी कोणताही वारा किंवा वादळ नसताना हे झाड अचानक रस्त्यावर चालत्या गाडीवर उन्मळून पडले. दरवर्षी या भागातील धोकादायक आणि अर्धवट जळालेल्या झाडांचा अहवाल संबंधित प्रशासनाकडे पाठवला जातो. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. हे झाड जर प्रवाशांच्या सीटवर पडले असते तर अनेक संसार उद्ध्वस्त झाले असते. दरवर्षी आम्ही अहवाल देतो, पण प्रशासन ढिम्म आहे. धोकादायक झाडे त्वरित न हटवल्यास आता तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी महेश भोई यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी अपघाताचा रितसर पंचनामा केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या दुर्घटनेमुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT