स्वच्छ समुद्रकिनाऱ्याचे आकर्षण महागात; मिठमुंबरी बीचवर पर्यटकांची कार वाळूत रुतली 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : स्वच्छ समुद्रकिनाऱ्याचे आकर्षण महागात; मिठमुंबरी बीचवर पर्यटकांची कार वाळूत रुतली

सूचनाफलक नसल्याने हरियाणातील पर्यटक अडचणीत; स्थानिकांच्या मदतीने संकटातून सुटका

पुढारी वृत्तसेवा

देवगड : देवगड तालुक्यातील मिठमुंबरी समुद्रकिनाऱ्यावर हरियाणातून आलेल्या पर्यटकांच्या कारला वाळूत रुतल्याने मोठी अडचण निर्माण झाली. सुदैवाने स्थानिकांच्या तत्परतेमुळे कार सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली आणि पर्यटकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

हरियाणातील एक पर्यटक कुटुंब कोकण पर्यटनासाठी आले होते. देवगडहून कुणकेश्वरकडे जात असताना तारामुंबरी पुलाजवळून प्रवास करताना त्यांचे लक्ष मिठमुंबरीच्या स्वच्छ आणि आकर्षक समुद्रकिनाऱ्याकडे गेले. समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य पाहून त्यांनी कार थेट किनाऱ्याकडे वळवली. मात्र समुद्रकिनाऱ्यावरील मऊ वाळूचा अंदाज न आल्याने काही अंतर पुढे जाताच कार वाळूत खोलवर रुतली.

कुणकेश्वरपर्यंतचा अवघ्या दहा-पंधरा मिनिटांचा प्रवास या घटनेमुळे जवळपास तासभर खोळंबला. कार बाहेर काढण्यासाठी पर्यटकांनी प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही. दरम्यान, गाडीत असलेले लहान मूल घाबरून रडू लागल्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष या घटनेकडे गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि सागरी मार्गावरील वाहतूक करणाऱ्या काही व्यक्तींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मदतीने रुतलेली कार बाहेर काढण्यात आली. त्यानंतर पर्यटक कुटुंबाने स्थानिकांचे आभार मानले.

स्थानिकांच्या मते, मिठमुंबरी समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असले तरी समुद्रकिनाऱ्यावर वाहन नेऊ नये किंवा वाळूत वाहन रुतू शकते, याबाबत कोणतेही स्पष्ट सूचनाफलक लावलेले नाहीत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना संभाव्य धोक्याची कल्पना होत नाही. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि अशा घटना टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने समुद्रकिनाऱ्यावर योग्य ठिकाणी सूचना फलक उभारावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT