सागवान तस्करी उधळली; तिघे संशयित ताब्यात 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Crime : सागवान तस्करी उधळली; तिघे संशयित ताब्यात

पाळणेकोंड फाट्यावर सावंतवाडी वन विभागाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : कुणकेरी येथील पाळणेकोंड धरण फाट्यावर वन विभागाने पहाटेच्या सुमारास एक मोठी कारवाई करत सागवान लाकडाची बेकायदेशीर तस्करी उधळून लावली. याप्रकरणी वाहनाचा पाठलाग करून तपासणी केली असता, विनापरवाना सागाच्या नगांची वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले. हा सर्व माल शासकीय जंगलातून चोरल्याचा संशय असल्याने वन विभागाने मालासह वाहन जप्त केले असून, ते विक्री आगारात जमा केले आहे. याप्रकरणी वन विभागाने कुणकेरी येथील राजन लिंगू गावडे, योगेश परब आणि लाडू कुणकेरकर या तिघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

कुणकेरी पाळणेकोंड धरण फाट्यावरून बेकायदेशीररित्या सागाची वाहतूक होणार असल्याची कुणकुण वन विभागाला लागली होती. त्यानुसार पथकाने पाळत ठेवली असता, पहाटेच्या सुमारास एक संशयास्पद वाहन जाताना दिसले. वन विभागाच्या पथकाने या वाहनाचा थरारक पाठलाग करून त्याला थांबवले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात कोणत्याही परवान्याशिवाय सागाचे नग आढळून आले.

ही धडक कारवाई सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे आणि सावंतवाडी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईच्या थेट पथकात कुणकेरी वनपरिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप, वनरक्षक सदानंद मोहिते आणि अक्षय कुंभार यांचा समावेश होता.

ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींची सध्या कसून चौकशी सुरू असून, या तस्करीमागे आणखी कोणाचा हात आहे का, याचा तपास कुणकेरी वनपरिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप करत आहेत. वनविभागाच्या या धाडसी कारवाईमुळे परिसरातील लाकूड तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT