कणकवली : देवगड येथील बीएलओ आणि एसआयआर प्रशिक्षण कार्यक्रमात कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी शिक्षकाला उद्देशून अपमानास्पद आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत सोमवारी दुपारनंतर सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती व विविध शिक्षक, सरकारी कर्मचारी संघटनांच्या वतीने येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुमारे तीन तास निषेध आंदोलन करण्यात आले. आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रांताधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, बीएलओचे काम करणार नाही, असा इशारा समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष राजन कोरगावकर यांनी दिला.
दुपारी २.३० वा. पासून सुरु झालेले हे आंदोलन सायंकाळी ५.३० वा.पर्यंत सुरु होते. आंदोलनादरम्यान प्रांताधिकारी कातकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान सायंकाळी ५.३० वा. कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे आंदोलनस्थळी दाखल झाले. तुमच्या मागण्या राज्य शासनाकडे पोहोचविल्या जातील, असे आश्वासन देशपांडे यांनी दिले. त्यानंतर शिक्षकांनी आंदोलन मागे घेतले. काही दिवसांपूर्वी देवगड येथे बीएलओ आणि एसआयआर प्रशिक्षणवर्ग सुरु होता. दुपारी २.३० वा. नंतरही प्रशिक्षण सुरुच असल्याने काही शिक्षकांनी छोट्या सुट्टीची मागणी केली. मात्र, कातकर यांनी अपशब्द वापरून अपमान केला, असा शिक्षकांचा आरोप आहे. याबाबत प्रांताधिकारी यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी त्यांचे निलंबन करा, या मागणीसाठी जिल्हाभरातील विविध शिक्षक, सरकारी कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, सदस्य सोमवारी कणकवलीत आंदोलनासाठी दाखल झाले. प्रांताधिकारी कार्यालयासमोर उड्डाणपुलाखाली शिक्षक आंदोलनास जमले. यावेळी शिक्षकांनी घडल्या प्रकाराचा घोषणा देत तीव्र शब्दांत निषेध केला.
कर्मचारी समन्वय समिती जिल्हाध्यक्ष राजन कोरगांवकर म्हणाले, शाळा सकाळच्या सत्रात असल्याने सकाळी शाळेत गेलेले शिक्षक तेथून थेट प्रशिक्षण वर्गासाठी जमले होते. दु. २.३० वा.वाजेपर्यंत प्रशिक्षण सुरु होते आणि शिक्षकांना अल्पोपाहार देखील देण्यात आला नव्हता. शिक्षण समितीचे देवगड तालुकाध्यक्ष जयेंद्र चव्हाण यांनी छोटासा ब्रेक देण्याची विनंती केली. मात्र, प्रांताधिकारी यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली. प्रांताधिकाऱ्यांचे हे निषेधार्ह असून त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी, असे ते म्हणाले.
दरम्यान, सायंकाळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे आंदोलनस्थळी दाखल झाले. देशपांडे यांनी शिक्षकांना आपल्या दालनात चर्चा करूया, असे आवाहन केले. मात्र, प्रांताधिकारी यांनी स्वत: आमच्याकडे यावे, अशी भूमिका शिक्षकांनी घेतली. अखेरीस शिक्षकांतर्फे तहसीलदार देशपांडे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले व तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले; मात्र शिक्षक इशाऱ्यावर ठामच होते.
आंदोलनात राज्य सरकारी समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष राजन कोरगांवकर, राज्यस्तरीय पदाधिकारी सखाराम सकपाळ, राजन वालावलकर, उदय शिंदे, सयाजी पाटील, भाई चव्हाण, शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, अखिल भारतीय शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष म. ल. देसाई, शिक्षक भारतीचे राज्य कार्याध्यक्ष संजय वेतुरेकर, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम, मुख्याध्यापक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष वामन तर्फे, नंदकुमार राणे, प्राथमिक शिक्षक समिती महिला आघाडी जिल्हाध्यक्ष निकीता ठाकूर यांच्यासह जिल्हाभरातील शिक्षक उपस्थित होते.