School Student Pudhari
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : विद्यार्थी ‘ॲकॅडमी’त अन्‌ परीक्षा विद्यालयात

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पर्याय; पालकांवर आर्थिक ताण

पुढारी वृत्तसेवा

नितीन सावंत

कणकवली : गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्पर्धा परीक्षांची तयारी, कौशल्य विकास, करिअर मार्गदर्शन अशा अनेक बाबींचा विचार करून विद्यार्थ्यांना ॲकॅडमीमध्ये पाठविले जाते. त्यामुळे असे विद्यार्थी नाममात्र शाळेत आणि ॲकॅडमीमध्ये नियमित उपस्थित राहून परीक्षेपुरतेच विद्यालयात उपस्थित राहताना दिसतात. गेल्या काही वर्षात हा नवा ट्रेंड शिक्षण क्षेत्रात निर्माण झाला आहे. बहुतांश पालक आर्थिक ताण सहन करुनही मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हा पर्याय स्वीकारताना दिसतात. मात्र यातून अशा विद्यार्थ्यांचे छंद व व्यक्तिमत्व विकास हे बाजुला पडते. विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा अतीताण व शाळा-ॲकॅडमी यांची सांगड घालताना कसरत करावी लागते.

मोठ्या शहरांतील ॲकॅडमीचे प्रस्त आता जिल्हा आणि तालुकास्तरापर्यंत निर्माण झाले आहे. याची अनेक कारणे असली तरी पालक व विद्यार्थ्यांचा ओढा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र यातून काही विद्यार्थी जीवनामध्ये त्रुटी निर्माण होताना दिसून येतात. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा अतिरिक्त ताण येण्याचा धोका तेवढाच असतो. गेल्या काही वर्षात सिंधुदुर्गात अशा ॲकॅडमींचे प्रमाण वाढले आहे. त्याला शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षणाच्या गुणवत्तेचा दर्जाही तेवढाच जबाबदार आहे.

अनेक विद्यालयांमध्ये शालेय अभ्यासक्रमापलिकडे जावून विद्यार्थी सक्षमपणे घडविण्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. संस्थाचालक, पालक यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण अपेक्षीत असले तरी शिक्षकांकडूनही त्याला तेवढाचा प्रतिसाद मिळणे अपेक्षीत आहे. आपल्या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केला, आपल्या विषयाचा निकाल चांगला लागला की आपली जबाबदारी संपली अशी भावना बहुतांश शिक्षकांमध्ये दिसून येत असल्याने तिथे गुणवत्तापूर्ण शिक्षण दुर्लक्षीत राहते. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे, त्यांना स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी सक्षम बनविणे याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. तशी मानसिकता नसल्याने शिक्षकी पेशा हा व्यवसायिक होताना दिसत आहे. यासाठी पालक आपल्या पाल्यासाठी ॲकॅडमीचे पर्याय निवडतात.

ॲकॅडमींमधून विषयतज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध केले जाते. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी तेवढ्याच ताकदीने करून घेतली जाते. पालकांना काय अपेक्षीत आहे, विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे याचा विचार करून ॲकॅडमी आपली धोरणे राबवत असतात. नियोजबध्द अभ्यासक्रम, नियमित चाचण्या, स्पर्धा परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण, वैयक्तीक शंकांचे निरसन, प्रगतीचे मूल्यमापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना ऑनलाईन वर्ग, डिजिटल नोटस्‌, रेकॉर्डेड लेक्चर्स, करिअर मार्गदर्शन, प्रेरणादायी सत्रे राबवत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यावर लक्ष देतात. त्याचबरोबर अभ्यासात सातत्य ठेवत चांगले शैक्षणिक यश मिळण्यासाठी मदत केली जाते.

ॲकॅडमींकडे विद्यार्थ्यांचा कल वाढण्याची कारणे शोधत शाळा, विद्यालयांमधून तशा उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. कारण ॲकॅडमींमध्ये जाणारा विद्यार्थी हा नोकरदार, व्यवसायिक अशा वरचा आर्थिक स्तरातील असतो. ग्रामीण शेतकरी, सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना ॲकॅडमी परवडत नसल्याने त्यांना शाळा, विद्यालयांवर अवलंबून रहावे लागते. परिणामी गुणवत्ता आणि स्पर्धा परीक्षांमध्ये हे विद्यार्थी मागे राहतात.

ॲकॅडमीची निवड करताना डोळसपणा हवा

विद्यार्थ्यांच्या करिअरचा विचार करून पालक ॲकॅडमीचा पर्याय निवडत असले तरी तेथील गुणवत्ता, शिक्षकांचा अनुभव, शिकवण्याची पध्दत याची माहिती घेणे आवश्यक आहे. अनेक ॲकॅडमींमधून जाहीरातबाजीवर भर दिला जातो. त्यातून फसवणूक होण्याचा धोका अधिक असतो. असे झाल्यास त्या विद्यार्थ्याच्या करिअरचे नुकसान होवू शकते. काही ॲकॅडमी निकालांचे अवास्तव दावे करून विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल करू शकतात. त्यामुळे पालकांनी डोळसपणे हा पर्याय स्वीकारणे योग्य ठरणार आहे. ॲॅकॅडमीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर अभ्यासावर अधिक लक्ष दिला जातो, परिणामी विद्यार्थ्याचे अंगभूत कलागुण, छंद हे अनेकवेळा दुर्लक्षीत राहू शकतात. विद्यालयीन जीवनातील अनेक आनंदाचे क्षण अशा विद्यार्थ्यांना मुकावे लागतात. त्याचबरोबर सततच्या अभ्यासाचा मानसिक ताण येण्याचा धोकाही अधिक असतो. शाळा, विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अनेक सुविधा निर्माण केल्या जातात. सुरक्षिततेच्या उपाययोजनाही असतात. मात्र ॲकॅडमींमध्ये अशा सुविधा व सुरक्षिततेच्या उपाययोजना किती प्रमाणावर असतात हेसुध्दा पालकांनी तपासणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT