दोडामार्ग : पश्चिम घाटातील पावसाने यंदा घेतलेल्या विश्रांतीचा सर्वाधिक परिणाम तिलारी आंतरराज्य धरणावर दिसून येत आहे. जुलैचा तिसरा आठवडा संपत आला, तरी धरणाची पाणीपातळी अद्याप १०२.०२ मीटर इतकीच असून १०६.७० मीटर या सांडवा माथा पातळीपासून ती तब्बल पावणे पाच मीटर दूर आहे. जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू होणाऱ्या तिलारीने यंदा मात्र पावसाची प्रतीक्षाच सुरू ठेवली आहे. त्यामुळे उर्वरित दहा दिवसांत मान्सून जोर धरतो की तिलारीची प्रतीक्षा आणखी वाढते? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
तिलारी आंतरराज्य धरणाचे नियोजन ठराविक टप्प्यांनुसार केले जाते. दरवर्षी १ जूनपासून धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडे ठेवले जातात. धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग खळग्यातील दगडी धरणातून केला जातो. धरणाची सांडवा माथा पातळी १०६.७० मीटर निश्चित असून, ही पातळी ओलांडल्यानंतर अतिरिक्त पाणी वाहू लागते. यानंतर ३१ जुलैला धरणाचे दरवाजे बंद करण्यात येतात. त्यानंतर १० ऑगस्टपर्यंत पाणीपातळी १०९.७० मीटर, तर २० ऑगस्टपर्यंत ११२.२० मीटर इतकी वाढविण्याचे नियोजन असते. पावसाच्या प्रमाणानुसार या काळात धरणाच्या दरवाजांची उघडझाप केली जाते.
यंदा मात्र पावसाची अस्थिर वाटचाल धरणातील पाणीसाठ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. तिलारी जलसंपदा विभागाच्या सकाळी ७:३० वा.च्या नोंदीनुसार १६ जुलैला ९८.२६ मीटर असलेली पाणीपातळी १७ जुलैला ९८.५० मीटर, १८ जुलैला १००.१० मीटर, १९ जुलैला १०१.०८ मीटर आणि २० जुलैला १०१.७० मीटर इतकी व दुपारी ३.३० वा. १०२.०२ इतकी झाली आहे. वाढ होत असली, तरी तिचा वेग अत्यंत संथ आहे.
जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यात तिलारी धरण सांडवा माथा ओलांडते आणि अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू होतो. नदीपात्र भरून वाहू लागते, तर धरण परिसरातही पाण्याचा प्रवाह वाढलेला दिसतो. यंदा मात्र जुलैचा बहुतांश कालावधी उलटूनही अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे यंदाचा मान्सून तिलारीसाठी वेगळाच ठरत असल्याची चर्चा सुरू आहे.
सांडवा पातळी गाठणार की नाही?
हवामान विभागाने पुढील काही दिवसांत कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज प्रत्यक्षात उतरला, तर धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ होऊन सांडवा माथा गाठण्याची शक्यता आहे. अन्यथा अनेक वर्षांनंतर प्रथमच जुलै अखेरीस तरी तिलारी धरण सांडवा पातळी गाठू शकणार की नाही? असा प्रश्न आहे.