मुंबई : मंत्रालयात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री नितेश राणे, सोबत आ. दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धा भोसले, लखमराजे भोसले. 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Tourism : मोती तलावाचे पुनरुज्जीवन अन् सौंदर्यीकरण होणार

मंत्रालयात आयोजित बैठकीत आराखड्यावर सविस्तर चर्चा

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध मोती तलावाच्या पुनरुज्जीवन व आधुनिक सुविधांसह त्याचा कायापालट करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक आणि सविस्तर सादरीकरण पार पडले.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या मंत्रालयातील दालनात ही बैठक झाली. मोती तलावाचे ऐतिहासिक महत्त्व पूर्णपणे अबाधित ठेवत, पर्यटन आणि सौंदर्यीकरणासह या परिसराला आकर्षणाचे मुख्य केंद्र म्हणून विकसित करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला आ. दीपक केसरकर, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोंसले, युवराज लखमराजे भोसले, वास्तुविषारद स्वरदा पोयरेकर, अजय नायक आणि श्रद्धा कदम उपस्थित होते. हा उपक्रम जनतेच्या कल्याणासाठी शासन आणि राजघराण्याने एकत्र येऊन केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे एक उत्तम प्रतीक असल्याचे गौरवोद्गार मंत्री राणे यांनी काढले.

ते म्हणाले, आजच्या आधुनिक काळात 'हेरिटेज' म्हणजेच वारसा पर्यटन केंद्रे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक शहरांच्या बदलत्या गरजा लक्षात घेणे गरजेचे आहे. हीच गरज ओळखून ‘थर्टी स्क्वेअर’ आणि ‘आरजेबी-सीपीएल’ यांनी त्यांचे पर्यावरण भागीदार 'एज्युकेटेड एन्व्हायर्नमेंट' (इडेन एलएलपी) यांच्या सोबतीने एक सर्वसमावेशक विकास आराखडा या बैठकीत सादर केला. हा संपूर्ण प्रकल्प ‘लोकांसाठी, जागेसाठी आणि पाण्यासाठी’ अशा तीन मुख्य मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित आहे. मोती तलाव हा एकेकाळी शहरातून वाहणाऱ्या पाण्याचा मुख्य नैसर्गिक साठा होता, त्यामुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून तलावाच्या परिसंस्थेचे पुनरुज्जीवन करणे, पाणी स्वच्छ करणे, पाण्याचे संवर्धन करणे आणि तलावाच्या संरक्षक भिंतींचे मजबुतीकरण करणे यावर या प्रस्तावात विशेष भर देण्यात आला आहे.

जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्याचे उद्दिष्ट

स्थानिक संस्कृतीचा सन्मान करत जागतिक पर्यटकांना शाश्वत पद्धतीने आकर्षित करणे हे या प्रकल्पाचे अंतिम उद्दिष्ट आहे. या माध्यमातून स्थानिक पर्यावरण, संस्कृती आणि आर्थिक उपजीविका मजबूत करण्यासाठी विविध सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने फूड पार्क आणि नौकाविहार सुविधा, उत्सव प्लाझा व पारंपरिक घाट, दशावतार नाटक आणि इतर स्थानिक कलाप्रकारांसाठी खुलं नाट्यगृह (ॲम्फीथिएटर) विकसित केले जाईल. संपूर्ण तलाव परिसर पारंपरिक घाटांच्या संकल्पनेवर आधारित शांत व निसर्गरम्य बनवला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT