देवगड/मालवण : देवगड व मालवण तालुक्यातील किनारपट्टी परिसरात दुर्मीळ समुद्री पक्षी ‘मास्क्ड बुबी’ (Sula dactylatra) आढळून आल्याने पक्षीप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हा पक्षी स्थानिक ग्रामस्थ आनंद देवगडकर यांना आढळून आला. मालवण दांडी-श्रीकृष्ण वाडी किनाऱ्यावर हे पक्षी आढळून आले. दोन्ही ठिकाणी हा पक्षी अशक्त स्थितीत आढळून आल्याने वन कर्मचाऱ्यांनी या पक्ष्यांना वन्यजीव उपचार केंद्रात नेले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
पक्षी दमलेेले असल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना सागरी वन्यजीव उपचार केंद्रात हलवले. कांदळवन विभागाच्या सागरी वन्यजीव उपचार केंद्रामार्फत रिफ वॉच मरीन काँझर्वेशनचे पशुवैद्य मनोहर नगरे हे त्या पक्ष्यांवर उपचार करत असून, पक्षी सुखरूप आहेत, अशी माहिती उपचार केंद्रातून देण्यात आली.
जिल्ह्यातील किनारपट्टीवर या पक्ष्यांची नोंद होणे ही दुर्मीळ बाब मानली जात असून, या घटनेमुळे परिसरातील जैवविविधतेकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. नागरिकांना असा दुर्मीळ पक्षी अथवा वन्यजीव आढळल्यास त्यांना कोणतीही इजा न करता तातडीने संबंधित वन विभागाशी संपर्क साधवा, असे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले आहे.
असा असतो ‘मास्क्ड बुबी’ पक्षी
मास्क्ड बुबी हा प्रामुख्याने उष्णकटिबंधीय महासागरांमध्ये आढळणारा समुद्री पक्षी आहे. त्याचे शरीर पांढऱ्या रंगाचे असून, पंखांच्या टोकांवर काळा रंग आणि डोळ्यांभोवती काळ्या रंगाचा ठळक पट्टा असल्याने त्याला ‘मास्क्ड बुबी’ असे नाव पडले आहे. हा पक्षी समुद्रावर उंच भरारी घेत मासे आणि इतर जलचरांची शिकार करतो.