मालवण : गेले दोन तीन दिवस बंद असलेला मालवण शहरातील रॉकगार्डनचा वीजपुरवठा मंगळवारी अखेर पूर्ववत झाला. त्यामुळे रॉकगार्डन मंगळवारी उजाळून निघाल्याचे दिसून आले. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांचे आभार मानले आहेत.
रॉकगार्डनचा वीजपुरवठा खंडित झाल्याने गेले काही दिवस पालिका प्रशासनाने ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचे तसेच पालिकेचेही नुकसान होत होते. याबाबत स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत, माजी नगरसेवक यतीन खोत यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी सर्व पर्यटन व्यवसायिकांसोबत सोमवारी सकाळी पालिकेत धडक देत अधिकार्यांना जाब विचारला होता. रॉकगार्डनच्या समस्या तात्काळ दूर करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार मंगळवारी पालिका प्रशासनाने रॉकगार्डनचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याची कार्यवाही केली. त्यामुळे ते पुन्हा प्रकाशमान झाले. मंगळवारी दुपारी रॉक गार्डन परिसरातील वीज घरामध्ये सुरू असलेल्या वीज जोडणीच्या कामाची पाहणी माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी केली होती. वीजपुरवठा सुरळीत झाल्याने स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी शिल्पा खोत यांचे आभार मानले आहेत.