सावंतवाडी : ओटवणे येथे महिंद्रा पिकअप व दुचाकी यांच्यात मंगळवारी झालेल्या अपघातात गंभीर जखमी सीमा सचिन तळवडेकर (४२, रा. सरमळे) यांचा बुधवारी पहाटे बांबोळी-गोवा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सरमळे- कुंभारवाडी येथील आदिराज सचिन तळवडेकर हा मंगळवारी दुपारी प्लेजर दुचाकीने आई सीमा तळवडेकर हिला सोबत घेऊन सावंतवाडीतून ओटवणेमार्गे सरमळे गावी येत होता. याचवेळी जयसिंगपूर येथील विजय रावसाहेब मगदूम हा आप महिंद्रा बोलेरो घेऊन सरमळे ते सावंतवाडी जात होते. या दोन्ही गाड्या ओटवणे कापईवाडी-देऊळवाडी सीमेदरम्यानच्या धोकादायक वळणावर आल्या असता दोन्ही गाड्यांमध्ये चालकाच्या बाजूने जोरदार धडक बसून अपघात झाला.
ही धडक एवढी जबरदस्त होती की, दुचाकीवरील सीमा तळवडेकर यांचा पाय हाडातून कापला गेला तर दुचाकी चालवत असलेल्या आदिराज तळवडेकर याच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत दोघांनाही प्रथम सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र दोन्ही पाय निकामी झालेल्या सीमा तळवडेकर यांना अधिक उपचारासाठी बांबोळी-गोवा रुग्णालयात नेण्यात आले. या गंभीर अपघाताचा सीमा तळवडेकर यांना प्रचंड मानसिक धक्काच बसला. यातच त्यांचा बुधवारी पहाटे ३.३० वा. च्या दरम्यान मृत्यू झाला. त्या माजगाव उद्यमनगर येथे कामाला होत्या. त्यांच्या अकाली निधनाने तळवडेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हे वृत्त समजताच सरमळेवासीयांनाही धक्का बसला. केसरी येथील के. एस. आर एक्वेरियमचे सुपरवायझर सचिन तळवडेकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासू-सासरे असा परिवार आहे.