सिंधुदुर्गनगरी : जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्याशी चर्चा करताना अमित सामंत व राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पदाधिकारी. (छाया : संजय वालावलकर) 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : खोट्या सह्या मारून बिले लाटणार्‍यांवर कारवाई करू

जि. प. सीईओंचे राष्ट्रवादी (एसपी)च्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अनामतसह कामाच्या १३ बिलांवर कार्यकारी अभियंतांच्या खोट्या सह्या मारून बिले लाटू पाहणार्‍या संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस( श.प.)च्या कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मंगळवारी सकाळी त्यांच्या दालनात भेट घेतली. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही. याच्यामागे जो कोणी गॉडफादर आहे त्यांच्यावरही कारवाई करा, असा पवित्रा घेतला. जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सायंकाळपर्यंत कार्यकारी अभियंता गुन्हा दाखल करतील आणि दोषीवर कारवाई करू, असे स्पष्ट केल्यानंतर हा घेराव मागे घेण्यात आला. या प्रकरणी कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिला.

सिंधुदुर्गनगरी येथे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घेराव घातला. कुडाळ तालुकाध्यक्ष शिवाजी घोगळे, कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, उत्तम सराफदार, चंद्रकांत नाईक, नयन गावडे, सचिन पाटकर, देवेंद्र पिळणकर, रमेश राणे, महेश चव्हाण, अमित लाड, जगदीश तेंडुलकर, राजन वालावलकर, आबा पाटकर, अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष नझीर शेख, वैभववाडी तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात जिल्हा परिषदेच्या काही कामांची अनामत रक्कम आणि कामाची बिले अशा एकूण १३ बिलांवर एका ठेकेदाराने कार्यकारी अभियंत्यांच्या सह्या करून बिले लाटण्याचा प्रकार केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती समजताच संबंधित ठेकेदारांवर कारवाई व्हायला हवी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे जि. प. सीईओंची भेट घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करताना अमित सामंत म्हणाले,‘म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावता नये’.याप्रकरणी पालकमंत्र्यांनीच या प्रकरणात गॉडफादर असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यावरून या प्रकरणाची गंभीरता लक्षात येते. तरी या प्रकरणी कडक कारवाई, करावी अशी मागणी अमित सामंत व पदाधिकाऱ्यांनी केली. अनंत पिळणकर यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत जिल्ह्यात अनेक कामे प्रलंबित आहेत, त्या कामांमध्ये कोट्यावधी रुपये खर्च होऊन शासनाचा निधी वाया गेला आहे. या कामांमध्ये कुर्ली नवीन वसाहतमधील एका कामाचा समावेश आहे. लोरे गावामध्ये पाण्याचा स्त्रोत आणि कुर्ली नवीन वसाहतीमध्ये पाईपलाईन यामुळे आम्ही ग्रामस्थांनी ते काम रोखून धरले आहे, याकडे जि. प. सीईओंच लक्ष वेधले.

शिवाजी घोगळे यांनी बांधकाम विभागात काही ठराविक व्यक्तींना कामे दिली जातात. सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांना कामे घेतल्यास त्यांना ते काम मिळू नये या दृष्टीने प्रयत्न केले जातात आणि अशाच काही ठेकेदारांकडून कार्यकारी अभियंत्यांची बोगस सही करून बिले लाटण्याचा प्रकार घडतात, असे सांगितले.

जि. प. कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत हे सुट्टीवर गेल्यामुळे तक्रार दाखल करण्यास विलंब झाला. ते आजच कामावर हजर झाले असून ते आजच गुन्हा दाखल करतील, अशी ग्वाही सीईओ रवींद्र खेंबुडकर यांनी दिली. दरम्यान कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत हे उपस्थित होताच त्यांनीही आपण पोलिस स्टेशनवर जाऊन प्रत्यक्षात गुन्हा दाखल करण्याबाबत दृष्टीने सविस्तर माहिती पोलिसांना दिली असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT