दांडी येथे पर्यटकांकडून स्थानिकांना मारहाण  pudhari photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg Crime : दांडी येथे पर्यटकांकडून स्थानिकांना मारहाण

नागरिक संतप्त : पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर स्थिती नियंत्रणात

पुढारी वृत्तसेवा

मालवण : दांडी मार्गांवर स्थानिक नागरिकांना पर्यटकांकडून शिवीगाळ व मारहाण झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर स्थानिक नागरिक संतप्त बनले. मारहाण करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी आक्रमकपणे करण्यात आली. काही काळ वातावरण तंग बनले होते. पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी वादावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पोलिस निरीक्षक मारूती जगताप यांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावावर नियंत्रण मिळविल्याने वातावरण शांत झाले.

दरम्यान, कडक पोलिस बंदोबस्तात पर्यटकांची गाडी आणि पर्यटकांना दांडी किनाऱ्यावरून पोलिस स्थानकात आणण्यात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत यावर चौकशी सुरू होती. पर्यटक मिनी ट्रॅव्हलरने मासळी खरेदीसाठी दांडी किनाऱ्यावर आले होते. जाण्याचा अरुंद मार्ग लक्षात घेता गाडी बाजूला घ्यावी व या सांगण्याचा राग येऊन गाडीतील दोघा युवकांनी स्थानिकांवर हात उचलला होता. यावर गाडीतील इतरही पर्यटकांनी स्थानिकांशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली.

काही काळातच स्थानिकांनी गर्दी करत पर्यटकांना गाडीतून खाली येण्याची सूचना केली. मात्र पर्यटकांनी गाडीतच थांबून राहत वाद घालण्यास सुरूवात केली. यामुळे स्थानिक नागरिक अधिकच आक्रमक बनले होते. पर्यटकांकडून गाडीतूनच स्थानिकांना शिवीगाळ करण्यात आल्याने अधिकच वाद वाढत गेला होता.

पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले होते. त्यांनी पर्यटकांना गाडीत थांबवून ठेवत स्थानिकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र पर्यटकांकडून देण्यात आलेली वागणूक आणि करण्यात आलेल्या शिवीगाळमुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त करत पर्यटकांवरच कारवाई करण्याची मागणी लावून धरली. तसेच सर्वांना खाली उतरवून त्यांच्याशी चर्चा करण्याची भूमिका घेतली.

पोलिस निरीक्षक मारूती जगताप हे घटनास्थळी पोहचल्यावर आक्रमक असलेल्या जमावाला शांत करत समजूत काढली. पर्यटकांनाही समज देत त्यांनाही पोलिस स्थानकात घेऊन गेले. दरम्यान पर्यटकांकडून स्थानिकांना झालेल्या मारहाणीचा शहरवासीयांकडून निषेध व्यक्त करण्यात आला असून पर्यटकांनी शांततेत व संयमाने आपल्या मर्यादेत राहून पर्यटनाचा आनंद लुटावा अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT