देवगड : मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या पाच युवकांपैकी एक बुडाला असून तिघांना वाचविण्यात स्थानिक मच्छीमारांना यश आले. चैतन्य राजेंद्र गुरव (२२, मूळ रा.दादर नायगाव) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे तर सोहम जयेश मंडोद (20, मूळ रा.दादर, नायगाव) याची प्रकृती चिंताजनक असून त्याला जामसंडे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना रविवारी सायंकाळी ५.४५ वा. च्या सुमारास घडली.
देवगड-ब्राम्हणदेववाडी येथे राहणारा यश राजेंद्र उपरकर (२१) हा दादर-नायगाव येथे वास्तवास आहे. तेथील त्याचे मित्र ओम दीपक चव्हाण (१७), चैतन्य राजेंद्र गुरव, सोहम जयेश मंडोद आणि अर्णव राजेश तारी (२०) यांच्यासमवेत तो सुट्टीनिमित्त देवगड येथे गावी आला होता.
रविवारी सायंकाळच्या सुमारास हे पाचहीजण मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेले होते. यश हा किनाऱ्यावर राहिला. तर उर्वरित चौघेजण पोहण्यासाठी समुद्रात उतरले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने हे चारही जण बुडू लागले. त्यांची ओरड ऐकून स्थानिक रमेश मनोहर तारी, लक्ष्मण मनोहर तारी, मनीष रमेश तारी, बाबुराव धुरी आणि बाळा राजम यांनी तत्काळ घटनास्थळी जात मदत केली.
बाबुराव धुरी व बाळा राजम यांनी नौकेच्या सहाय्याने बुडणाऱ्या युवकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. या मदतकर्त्यांनी ओम चव्हाण, सोहम मंडोद, अर्णव तारी यांना वाचवून किनाऱ्यावर आणले. सोहम मंडोद हा बेशुध्द असल्याने त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देत शुध्दीवर आणण्यात आले; परंतु या दरम्यान चैतन्य गुरव हा पाण्यात दिसेनासा झाला.
यावेळी स्थानिक मच्छीमारांना नौकांच्या सहाय्याने पाण्यात त्याचा शोध घेतला; परंतु सायंकाळी उशिरापर्यंत तो सापडला नाही. दरम्यान, प्रकृती चिंताजनक असलेल्या सोहम मंडोद याला तत्काळ खासगी वाहनाने देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी त्याला जामसंडे येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक संतोष भालेराव, स.पो.उपनिरीक्षक प्रवीण सावंत, पो.कॉ.प्रसाद आचरेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली.